डेबिट-क्रेडिट, कॉन्ट्रा एन्ट्री, ट्रायल बॅलन्स , बॅलन्सशीट (ताळेबंद) या शब्दांशी रोजचा व्यवहार करणाऱ्या चार्टर्ड अकौंटंट (सीए) मंडळींनी एकांकिकेमध्ये केलेल्या अभिनयाच्या माध्यमातून शब्द माध्यमाचे वेगळे रूप अनुभवले. किचकट हिशेब आणि रूक्ष करप्रणाली असे एकंदरीत रटाळ जीवन या समजाला छेद दिला गेला तो सीए व्यावसायिकांसाठी झालेल्या एकांकिका स्पर्धेतूनच.
‘इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे सीए आणि सीए विद्यार्थ्यांसाठी जितेंद्र घोडके करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सीए आणि सीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अशा ७० जणांनी सहभाग घेतला होता. केवळ रंगमंचावरील अभिनयच नव्हे, तर दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना या साऱ्या जबाबदाऱ्या सीए आणि आर्टिकलशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. मे. पत्की अँड सोमण फर्मने सादर केलेल्या ‘फुलपाखरू मरायलाच हवं?’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांकासह जितेंद्र घोडके करंडक पटकाविला. केंदळे अँड असोसिएटसची ‘सभ्य गृहस्थहो’ ही एकांकिका दुसऱ्या क्रमांकाची विजेती ठरली. राहुल ठेपे आणि श्रेया सावळे हे सवरेत्कृष्ट अभिनयाच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले.
प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि अभिनेते-सीए सुनील अभ्यंकर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. रवींद्र खरे, आदित्य इंगळे आणि गौरी लोंढे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे प्रायोजक जितेंद्र घोडके, आयसीएआयच्या पश्चिम विभागीय  कार्यकारिणीचे अध्यक्ष दिलीप आपटे, सर्वेश जोशी, जगदीश धोंगडे, रेखा धामणकर, अविनाश ओगले, समीर लढ्ढा, अमित लोमटे आणि राजेशकुमार पाटील या वेळी उपस्थित होते.