वकील असो डॉक्टर किंवा चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही क्षेत्रे म्हणजे प्रॅक्टिस ही ठरलेली. पण, नव्या पिढीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट झाल्यावर युवक हे प्रॅक्टिस करण्याऐवजी गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीलाच प्राधान्य देत आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये प्रॅक्टिस करण्याऐवजी नोकरी हेच उदारीकरणाचे धोरण स्वीकारले गेले आहे.
हे निरीक्षण आहे दी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) या ‘सीएं’ च्या शिखर संस्थेचे. या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मनोज फडणीस यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पूर्वी शंभरातील ७० ते ८० सीए हे स्वतंत्र व्यवसाय म्हणजे प्रॅक्टिस करायचे. तर, उर्वरित २० ते ३० सीए तातडी असल्याने उदरनिर्वाहाचे साधन म्हणून बँकेमध्ये नोकरी करीत होते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या प्रमाणामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. आता ५७ सीए उद्योगांमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या ‘पॅकेज’कडे आकृष्ट होत आहेत. तर, स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करणाऱ्या सीएंची संख्या ४३ वर स्थिरावली आहे. येत्या काही वर्षांत ही संख्या आणखी कमी झाल्यास आश्चर्य वाटणार नाही असे मत फडणीस यांनी नोंदविले.
देशभरामध्ये सध्या अडीच लाख सीए आहेत. त्यापैकी गेल्या पाच वर्षांत ८५ हजार सीए निर्माण झाले आहेत. मात्र, ज्यांच्या घरामध्ये वडील सीएची प्रॅक्टिस करीत आहेत त्याच घरातील युवा पिढी पॅ्रक्टिस करताना दिसते. मात्र, २३ व्या वर्षी सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या युवकाला दरवर्षी किमान सात लाख रुपयांचे ‘पॅकेज’ मिळते. त्यामुळे प्रॅक्टिस करायची आणि त्यामध्ये जम बसल्यावर उत्पन्नाची अपेक्षा करण्यापेक्षा युवा पिढी उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी काबीज करण्याला प्राधान्य देत आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये उद्योगांमध्ये गलेलठ्ठ पगारावर काम करण्याची सुसंधी असताना युवकांचा लवकरात लवकर अधिक उत्पन्न मिळविण्याकडे कल वाढला आहे. अतिशय कठीण अभ्यासक्रम पूर्ण करून चार्टर्ड अकाउंटंट होण्यामध्ये मुलींची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. सध्या एकूण सीएंमध्ये युवतींचे प्रमाण ४० टक्के आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यामध्ये साडेसहा हजार सीए
पुणे शहरामध्ये सहा हजार सीए असून िपपरी-चिंचवडमध्ये ही संख्या ७५० एवढी आहे. त्यामध्ये महिला सीएंची संख्या १६०० आहे. तर, पती-पत्नी असे दोघेही (कपल) चार्टर्ड अकाउंटंट अशी संख्या ४०० आहे. तर, दरवर्षी साधारणपणे २५ हजार युवक-युवती सीए परीक्षेचा अभ्यास करतात, अशी माहिती एस. बी. झावरे यांनी दिली. जे विद्यार्थी सीए अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाहीत किंवा काहींना वेगवेगळ्या कारणांनी मध्येच हा अभ्यासक्रम सोडावा लागतो त्यांना ‘अकाउंटिंग टेक्निशियन’ म्हणून मान्यता दिली जाते. एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटकडे आर्टिकलशिप केल्यामुळे त्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव असतो. त्यामुळे सीए परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या अशा विद्यार्थ्यांनाही चांगले अर्थार्जन करता येते, याकडे झांबरे यांनी लक्ष वेधले.