आपल्या विविध मागण्यांसाठी पुणे व मुंबईतील केबल ऑपरेटर्स येत्या बुधवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी ६ ते रात्री ९ या काळात केबल प्रक्षेपण बंद ठेवणार आहेत, तर काही ऑपरेटर्स संपूर्ण दिवसभर प्रक्षेपण बंद ठेवणार आहेत. महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फेडरेशन अंतर्गत लास्ट माईल ऑपरेटर असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
संघटनेचे महाराष्ट्राचे संघटक सतीश कांबिये यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र शासनाचा सध्याचा करमणूक कर ४५ रुपये आहे. त्याचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे. यामुळे केबल ग्राहकाच्या मासिक भाडय़ामध्ये वाढ करावी लागत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. तसेच डीटूएच कंपन्यांसाठी हाच कर केवळ २० रुपये आहे. त्यामुळे शासनाच्या या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त करुन करमणूक कर कमी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.              प्रक्षेपण कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात दरवाढ करुन ती लागू करण्याकरिता ग्राहकांच्या महत्त्वाच्या वाहिन्या बंद करून दबाव आणल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे.
कंपन्यांतर्फे राबवल्या जाणाऱ्या पॅकेज पद्धतीलाही असोसिएशनतर्फे विरोध दर्शविण्यात आला आहे.                                                                               ग्राहकांनी ऑपरेटर्सकडून सेट टॉप बॉक्स विकत घेतलेला असल्यामुळे केबल कंपन्यांनी त्याचा मालकी हक्क ग्राहकांना द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अशा विविध मागण्यांबाबत संघटनेची पुण्यात सोमवारी रात्री बैठक झाली. त्यात बुधवारी (२ ऑक्टोबर) रोजी प्रक्षेपण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे कांबिये यांनी सांगितले.