रिक्षाच्या भाडय़ामध्ये बदल झाल्यास किंवा प्रत्येक वर्षी ‘आरटीओ’कडून तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रिक्षाच्या मीटरचे प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) किंवा तपासणी वैध मापन विभागाकडून करून घेण्यास रिक्षा संघटनांनी विरोध केला आहे. मात्र, या प्रश्नी अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या प्रश्नावर आंदोलनात्मक भूमिका घेण्याची तयारी करण्यात आली आहे.
मीटरच्या तपासणीबाबत पूर्वीच्या व्यवस्थेप्रमाणे शहरातील मीटरच्या दुरुस्ती व सेवा केंद्राच्या माध्यमातून मीटरची दुरुस्ती किंवा त्यात बदल करून अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून मीटरचे प्रमाणीकरण केले जात होते. मात्र, मागील महिन्यापासून वैध मापन विभागाने शहरातील मीटर दुरुस्ती व सेवा केंद्रांना सील केले आहे. रिक्षाच्या मीटरबाबत कोणतेही काम न करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता मीटरच्या दुरुस्तीसाठी कुठे जायचे हा प्रश्न रिक्षा चालकांपुढे निर्माण झाला आहे. संबंधित मीटरच्या कंपनीकडे आता मीटर न्यावा लागणार आहे. मात्र, बहुतांश कंपन्यांची केंद्रही पुण्यामध्ये नाहीत.
कंपन्यांकडून मीटरची दुरुस्ती केल्यानंतर आता अभियांत्रिकी महाविद्यालयाऐवजी वैध मापन विभागाकडून मीटरचे प्रमाणीकरण करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर तंदुरुस्ती प्रमाणपत्र देण्यापूर्वी पुन्हा आरटीओ कडून मीटरची तपासणी केली जाईल. त्यामुळे रिक्षा चालकांना आता मीटरच्या बाबतीत दोन कायद्यातून जावे लागते आहे. त्याचा परिणाम म्हणून मीटरचे प्रमाणीकरणासाठी मोठा कालावधी लागतो आहे. त्यातून रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रिक्षा पंचायतीने या नव्या यंत्रणेला विरोध केला आहे. मीटर प्रमाणीकरणाला आमचा विरोध नाही, पण पूर्वीची पद्धत चांगली असतानाही नवी किचकट पद्धत रिक्षा चालकांवल लादली असल्याने आमचा त्यास विरोध आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडेच वैद्य मापन खाते येते. त्यामुळे त्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, अशी मागणीही पंचायतीने केली आहे.