भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानातील पुतळा उखडण्याचा प्रकार हा पैसे देऊन घडवून आणण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांनी त्यासंदर्भात जाहीर विधान करून पुतळा उखडल्याप्रकरणी पाच लाख रुपयांचा धनादेशही दिला आहे. लोकप्रतिनिधींनी गुंडांना फूस लावणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांचे आमदार पद रद्द करावे आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानातील पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उखडला होता. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते. या प्रकरणामागे आमदार नितेश राणे यांचा हात असल्याची चर्चाही सुरु झाली होती. त्यातच पुतळा हटविणाऱ्यांना पाच लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे सांगत बक्षिसाचा धनादेशही देत असल्याचे राणे यांनी एका जाहीर सभेत सांगितले होते. त्यांच्या या विधानाचा संदर्भ घेत मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे.

‘पैसे देऊन गुन्हे घडवून आणणे, तरुणांना गुन्ह्य़ासाठी प्रवृत्त करणे, समाजात जातीय तेढ निर्माण करणे, राज्याची साहित्य परंपरा उद्ध्वस्त करणे आणि अशा प्रकारचे गुन्हे करून घेण्यासाठी पैशांचा वापर करणे अशी गैरकृत्ये त्यांनी केली आहेत. यातूनच मोठय़ा प्रमाणातील गुंडगिरीचा उदय होत असून स्वत: लोकप्रतिनिधींनी गुंडांना फूस लावणे आणि स्वत:च्या पैशांचा त्यासाठी वापर करणे हा आमदार पदाच्या दृष्टीने गुन्हा आहे. त्यामुळे राणे यांचे आमदार पद रद्द करावे आणि त्यांना अटक करावी, अन्यथा राज्यभर पैशांच्या आधारे अशा प्रकारे गुंडगिरीच्या माध्यमातून विविध घटना आणि कृत्य ते घडवून आणतील,’ असे कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे.