पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. येथील वडगाव आनंद परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. अपघातामध्ये मृत पावलेले तिघेही जण मेडिकल व्यावसायिक असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळे फाटा येथील  वडगाव आनंद जवळ स्विफ्ट डिझायर गाडी(एम एच- १४, डी एक्स-१२३१) ही गाडी कठड्याला धडकून अपघात झाला. त्यानंतर गाडीने पेट घेतल्याने आगीत होरपळून तिघांचा जळून मृत्यू झाला. नरेश सखाराम वाघ(रा.पिंपळवंडी ता.जुन्नर) दिलीप चंद्रकांत नवले (रा.बाभूळवाडा ) आणि प्रशांत चासकर (रा. वडगाव आनंदमळा) अशी मृतांची नावे आहेत.

हे तिघेही काल पुण्यावरून त्यांच्या घरी परतत होते. मात्र, वडगाव आनंद परिसरातून जात असताना त्यांची कार एका कठड्याला धडकली. या धडकेनंतर गाडीने लगेचच पेट घेतला. गाडी कठड्याला जोरात धडकल्यामुळे कदाचित तिघेही जण बेशुद्ध पडले असावेत. त्यामुळे तिघांपैकी एकालाही गाडीतून बाहेर निघण्यासाठी वेळ मिळाला नाही. परिणामी आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची फारशी वर्दळही नव्हती. त्यामुळे बराच वेळ हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. या दरम्यान रस्त्यावरून गेलेल्या एखाद्या वाहन चालकाने मदत केली असती तर या तिघांचा जीव कदाचित वाचला असता. अखेर काही तासांनंतर या परिसरातील नागरिकांनीच ही आग विझवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतांची ओळख पटवली.