ससून सवरेपचार रुग्णालयात हृदयरोगाच्या रुग्णांसाठी ६ खाटांच्या अतिदक्षता विभागाचे (कार्डिअ‍ॅक केअर युनिट) काम अंतिम टप्प्यात आलेले असून सहा महिन्यांहून अधिक प्रतीक्षेनंतर अखेर हा विभाग येत्या पंधरा दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. रुग्णालयात वेगळा ‘कार्डिओलॉजी विभाग’ मात्र केव्हा सुरू होणार हा प्रश्न अनुत्तरितच असून ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयासाठी ससूनने पाठवलेल्या प्रस्तावावर अद्याप काहीही झालेले नाही.
सध्या रुग्णालयात वैद्यकीय अतिदक्षता विभाग (एमआयसीयू- पार्ट १) कार्यरत आहे. याच विभागाचा- ‘एमआयसीयू पार्ट-२’ सुरू केला जाणार असून तिथे हृदयरोगाच्या रुग्णांना ठेवले जाईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या विभागाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. सध्या रुग्णालयात हृदयरोगाच्या रुग्णांसाठी वेगळा अतिदक्षता विभाग नाही. हृदयविकाराच्या झटक्याच्या रुग्णांनाही नेहमीच्या अतिदक्षता विभागातच ठेवले जाते. या रुग्णांसाठी वेगळ्या खाटा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जानेवारीमध्येच कार्डिअ‍ॅक केअर युनिट सुरू करण्यात येणार होते. आता सहा महिन्यांनंतर ते सुरू होणार आहे.
‘सुपर स्पेशालिटी’चे काय?
रुग्णालयात सध्या वेगळा ‘कार्डिओलॉजी विभाग’ नाही. कार्डिओलॉजीसह ‘गॅस्ट्रोएंटेरोलॉजी’ (उदरविकारशास्त्र), ‘नेफ्रोलॉजी’ (मूत्रविकारशास्त्र) आणि ‘न्यूरोलॉजी’ (मेंदूविकारशास्त्र) या ‘सुपर स्पेशालिटी’ देखील मेडिसिन विभागाद्वारेच हाताळल्या जातात. सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी ससूनने दिलेल्या प्रस्तावालाही सहा महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. ‘सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळासंबंधीचा हा प्रस्ताव आहे. अद्याप या प्रस्तावावर पुढे काहीही झालेले नाही. सध्या या विभागांचे काम मेडिसिन विभागावरच अवलंबून आहे,’ असे या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.