बैलाच्या शिंगाला बसविलेले आरसे.. स्कूटरवरून जाताना साडीचा हवेत तरंगणारा पदर.. दुचाकीच्या रस्त्यावरून जाणारी बैलगाडी आणि त्यास अडविणारा पोलीस.. नांगररूपी सँडल्स.. बंदूक रोखून लुटणारा लुटारू.. अशा विविध विषयांना स्पर्श करीत संस्कृतीचे वेगवेगळे विषय उलगडणारी मंगेश तेंडुलकर यांच्या कुंचल्यातून साकारलेली व्यंगचित्रे पाहण्याची संधी िपपरी-चिंचवडमधील कलाप्रेमी रसिकांना लाभली आहे.

पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन सुरू झाले आहे. प्रसिद्ध प्रसूतिरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप कामत आणि डॉ. वैजयंती कामत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. गाडगीळ आणि सन्सच्या विक्री विभागाचे प्रमुख सतीश कुबेर, व्यवस्थापक समीर परांजपे, स्मिता मुधोळ, गिरीश वाघोलीकर या वेळी उपस्थित होते. चिंचवडमधील चापेकर चौकातील दुकानाच्या आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आलेले हे प्रदर्शन रविवापर्यंत (३१ जुलै) दररोज सकाळी साडेदहा ते रात्री आठ या वेळात खुले राहणार आहे. तेंडुलकर यांनी स्वत: निवडलेली शंभरहून अधिक व्यंगचित्रे या प्रदर्शनात आहेत. राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आणि पर्यावरण या विषयांवरील व्यंगचित्रे असून काही चित्रे शब्दविरहित आहेत. विविध राजकीय नेत्यांची व्यंगचित्रे हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले आहे.