त्यांच्या लग्नाला एक वर्ष होत आलेले असताना पत्नीच्या हाती अचानक एक सीडी लागली. सीडी पाहिल्यावर तिने ‘फेसबुक’ चा वापर करून नवऱ्याबद्दलची अधिक माहिती काढली आणि त्याचे बिंग फुटले. तिला मिळालेली माहिती धक्कादायक होती, तिच्या नवऱ्याने आधी चार लग्न केली होती आणि आता नाव बदलून त्याने पाचवे लग्न केले होते.
निगडी येथील २६ वर्षांच्या महिलेची अशा प्रकारे फसवणूक झाली. हे प्रकरण एवढय़ावरच थांबले नाही. नवऱ्याचे बिंग फुटल्याचे या महिलेने त्याला घटस्फोट मागितला. त्यावर नवऱ्यानेच तिच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यावर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध फसवणूक व बलात्कार केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला.
राजेश रामचंद्र रावतानी (वय ४०, रा. आयरिश सोसायटी, कोरेगाव पार्क, मूळ- हैद्राबाद) असे या भामटय़ाचे नाव. त्याने नाव बदलून सध्या ‘राज रविचंद्र दीक्षित’ हे नाव घेतले होते. त्याला कोरेगाव पार्क भागात गेल्या वर्षी चपल्लचे दुकान सुरू करायचे होते. त्याचे ‘इंटेरिअर डेकोरेशन’ चे काम या महिलेला दिले. यातून त्यांची ओळख झाली. रावतानीने याने हैद्राबाद येथे पूर्वी चार लग्नं केल्याची माहिती या महिलेला दिली नाही. ही महिला घटस्फोटित असल्याचा फायदा घेऊन तिच्याशी ओळख वाढविली. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मे २०१२ मध्ये त्याने या महिलेशी लग्न केले. या महिलेला काही दिवसांपूर्वी रावतानी याच्या साहित्यामध्ये एक सीडी मिळाली. त्यात त्याच्या पूर्वीच्या लग्नाचे चित्रीकरण दिसले. तिने चित्रीकरणात नाव असलेल्या तरुणीला ‘फेसबुक’ वरून शोधले व तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा रावतानी याने खोटे नाव घेतल्याचे उघड झाले. त्याने पूर्वी चार लग्नं केल्याची माहिती तिने दिली. या महिलेने लग्न केलेल्या सर्व मुलींकडे चौकशी केली. त्यानंतर तिने आरोपीला घटस्फोट मागितल्यानंतर त्याने पंचवीस लाख रुपये देण्याची मागणी केली, असे पोलिसांनी सांगितले.
या महिलेने खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सोमवारी आरोपीला अटक केली. त्याच्याकडे राज दीक्षित नावाचे झेरॉक्स पॅनकार्ड, वाहन परवाना आणि तीन वेगवेगळ्या बँकांची डेबिट कार्ड मिळून आली आहेत. त्याने या नावावर एका बँकेतून तीस लाख रुपयांचे कर्जही घेतले आहे. आरोपीने यापूर्वीच्या मुलींकडून पैसे उकळल्याचा संशय आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील सुचित्रा नरुटे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. ती मान्य करत न्यायालयाने त्याला २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.