मराठी भाषेतील ज्ञानभांडार ज्यामध्ये सामावले आहे ते विश्वकोशाचे सर्व खंड सीडीच्या माध्यमातून जतन करीत सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे भाषा अभ्यासकांची सोय झाली असून भविष्यात इंटरनेटशिवायही विश्वकोशाचे खंड पाहता येणार आहेत. प्रत्यक्ष प्रकाशनापूर्वी विश्वकोशाच्या नव्या २० व्या खंडाचा पूर्वार्ध ‘ऑनलाईन’वर विसावला आहे.
‘अ’ ते ‘ज्ञ’ पर्यंतच्या मुळाक्षरांतील मराठी भाषेतील संज्ञांचा परिचय मराठी भाषेतून करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विश्वकोश निर्मिती मंडळाने हाती घेतला. या प्रकल्पाचे प्रवर्तक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली १६ खंडांचे काम पूर्णत्वास गेले. त्यांच्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक मे. पुं. रेगे आणि प्रा. रा. ग. जाधव यांनी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्षपद भूषविले असून सध्या प्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजया वाड यांच्याकडे मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. विश्वकोशाच्या २० व्या खंडाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर नियमितपणे हा खंड अद्ययावत करण्यात येणार आहे. ‘सी-डॅक’ संस्थेच्या सहकार्याने हे खंड युनिकोडमध्ये आणण्यात आले आहेत. त्यामुळे विश्वकोश घराघरामध्ये पोहोचला आहे. विश्वकोशाच्या २० व्या खंडाचा पूर्वार्ध प्रकाशनापूर्वीच ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा खंड लवकरच प्रकाशित होणार असला तरी तो नोव्हेंबरमध्येच ‘अपलोड’ करण्यात आला आहे.
राज्य सरकारने यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेल्या विश्वकोशाच्या १७ खंडांची सीडी २००८ मध्ये तयार केली होती. मात्र, आता विश्वकोशाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातून सर्व २० खंड सर्वसमावेशक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व खंडांच्या सीडींचा संच करून ते सामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे मराठी भाषेचे विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधकांना इंटरनेटअभावी या सीडींचा वापर करता येणे शक्य होणार आहे, असे डॉ. विजया वाड यांनी सांगितले.

आवर्तन पूर्ण झाल्याचे समाधान
मराठी भाषेतील सर्व शब्द, संज्ञा हे ज्ञान कोशामध्ये आणण्याचे स्वप्न आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पाहिले होते. शास्त्रीबुवांच्या कालखंडात १६ खंडांचे काम पूर्ण झाले. माझ्या कारकिर्दीत चार खंडांचे काम पूर्णत्वास गेले आहे. शास्त्रीबुवांच्या कारकिर्दीत सुरू झालेल्या प्रकल्पाच्या पूर्तीमुळे आवर्तन पूर्ण झाल्याचे समाधान असल्याची भावना डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केली. २० व्या खंडामध्ये सुमारे ‘स’ ते ‘ज्ञ’ पर्यंतच्या १३५० नोंदी आहेत. त्यामुळे हा खंड दोन भागांत प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी पूर्वार्ध खंड तयार असून नागपूर येथे होत असलेले विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होणार आहे. खंडाचा उत्तरार्ध लवकरच प्रकाशित केल्यानंतर सर्व खंड अद्ययावत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.