सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनाची पद्धत मोडीत

केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अमलात आणलेल्या विद्यार्थ्यांचे उपक्रमांच्या माध्यमातून मूल्यमापन करून गुण देण्याच्या पद्धतीचा देशभर बोलबाला होऊन, राज्यांनी ही पद्धत अमलात आणण्यास सुरूवात केल्यावर आता सीबीएसईने ती मोडीत काढली आहे. सीबीएसईच्या शाळांमध्ये आता पूर्वीप्रमाणेच सहामाही परीक्षा, वार्षिक परीक्षा आणि वर्षभरात दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिकवर्षांपासून (२०१७-१८) ही पद्धत लागू करण्यात येणार आहे.

सीबीएसईमध्ये सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन प्रणालीद्वारे (सीसीई) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मोजमाप करण्यात येत होते. या प्रणालीनुसार वर्षभर वेगवेगळे प्रकल्प, उपक्रम यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळा करत असत. मात्र आता ही पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सीबीएसईने जाहीर केले आहे. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिक्षण देण्याच्या पद्धतीकडून पुन्हा एकदा लेखी परीक्षेकडे मंडळाने वाटचाल सुरू केली आहे.

सीबीएसईच्या शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता सत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत. सहामाही आणि वार्षिक अशा दोन सत्र परीक्षा आणि प्रत्येक सत्रात दहा गुणांच्या दोन चाचणी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा वर्षभराचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या वर्गासाठी तीन भाषा, विज्ञान, समाजशास्त्र, गणित आणि एक इतर विषय असे सात विषय असतील.

नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या धरतीवर असणार आहे. यामुळे शाळेच्या हाती असलेले विद्यार्थ्यांचे गुण कमी होणार आहेत. जुन्या पद्धतीनुसार ६० टक्के लेखी परीक्षा आणि ४० टक्के प्रात्यक्षिके आणि प्रकल्प अशी गुणांची विभागणी होती. मात्र यापुढे ९० टक्के लेखी परीक्षा आणि १० टक्के प्रात्यक्षिके अशी विभागणी होणार आहे.

दहावीच्या वर्गासाठी ज्याप्रमाणे सीबीएसईचा लोगो असलेले गुणपत्रक दिले जाते, त्याचप्रमाणे आता सहावीपासूनच शाळेच्या नावाबरोबर गुणपत्रिकांवर मंडळाचा लोगो असणार आहे.

गुणदान कसे असेल?

  • पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात १० गुणांची चाचणी परीक्षा, ५ गुण प्रकल्प वह्य़ा आणि ५ गुण प्रकल्प किंवा प्रात्यक्षिकांसाठी असतील.
  • सहामाही परीक्षा आणि वार्षिक परीक्षा ८० गुणांची असेल.
  • सहामाही परीक्षेसाठी पहिल्या सत्रासाठी निश्चित केलेल्या अभ्यासक्रमावर ही परीक्षा घेण्यात येईल.
  • वार्षिक परीक्षेसाठी दोन्ही सत्रातील अभ्यासक्रम असेल.
  • सहावीच्या वर्गासाठी पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमाचा १० टक्के भाग असेल, सातवीसाठी तो २० टक्के होईल आणि आठवीसाठी ३० टक्के भाग असेल.
  • नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे असेल.
  • शैक्षणिक विषय आणि शिक्षणपूरक विषयांचे मूल्यांकन स्वतंत्रपणे करून त्याची स्वतंत्र श्रेणी देण्यात येईल.