पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीची ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून (२५ मे) सुरू होत असून या वर्षी अकरावीसाठी ९४ हजार ५८० जागा आहेत. प्रवेशाचे माहितीपुस्तक विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत मिळणार असून त्यांनी शाळेतूनच अर्जाचा पहिला भाग भरायचा आहे. विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेमध्ये अर्ज भरू नये असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील महाविद्यालयांसाठी इयत्ता अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होत असून या वर्षी अकरावीसाठी ९४ हजार ५८० जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १४ हजाराने प्रवेश क्षमता वाढली आहे. प्रवेश प्रक्रियेचे माहितीपुस्तक गुरुवारपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत १५० रुपये भरून मिळणार आहे. त्याचप्रमाणे यंदा विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतूनच प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे. सध्या अर्जाचा पहिला भाग विद्यार्थ्यांनी भरायचा आहे. व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोटा किंवा अन्य कोणताही कोटा व व्यवसाय शिक्षण, आरक्षणांतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे.

अर्ज कसा भरायचा?

माहिती पुस्तकाबरोबर विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड देण्यात येणार आहे. तो वापरून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, वय, आरक्षणाचे तपशील अशा बाबी पहिल्या भागांत विद्यार्थ्यांना भराव्या लागणार आहेत. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज मुख्याध्यापकांकडून मान्य करून घेणे गरजेचे आहे. दहावीच्या निकालानंतर अर्ज भरण्याचा दुसरा टप्पा सुरू होणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

महत्त्वाचे काही

* प्रवेशासाठीचे संकेतस्थळ  – pune.11thadmission.net

*  विद्यार्थ्यांनी माहितीपुस्तिका आपापल्या शाळेतूनच विकत घ्यायच्या आहेत.

*  अर्जाची किंमत १५० रुपये आहे. त्यापेक्षा अधिक रकमेची मागणी झाल्यास प्रवेश समितीकडे त्याची तक्रार करावी

* आपल्या शाळेतूनच अर्ज भरायचा आहे.

* आरक्षणाचे लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडून अर्जाला मान्यता घ्यायची आहे.

* मार्गदर्शन केंद्रांवरही प्रवेशाचे माहिती पुस्तक मिळू शकेल.

* राज्य मंडळाशिवाय इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना आता अर्ज भरता येणार नाही.

*  या विद्यार्थ्यांना त्यांच्या मंडळाचे दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज भरता येणार आहे.

*  या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन केंद्र निश्चित करण्यात आली असून तेथे त्यांना माहितीपुस्तिका मिळतील.

विद्यार्थी अर्ज भरताना काही वेळा चुका करतात किंवा अर्ज अपूर्ण असतो. त्याचप्रमाणे अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेत जावे लागते आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारीही विद्यार्थ्यांकडून आल्या होत्या. त्यामुळेच या वर्षी शाळांमधूनच अर्ज भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळेतून हे अर्ज मोफत भरले जाणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मात्र तरीही विद्यार्थ्यांना जर सायबर कॅफेतून किंवा वैयक्तिक अर्ज भरायचा असेल, तर त्या अर्जाची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल.

– दिनकर टेमकर, अध्यक्ष अकरावी केंद्रीय प्रवेश समिती

इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र

आर.सी.एम.गुजराथी कनिष्ठ महाविद्यालय, गरवारे वाणिज्य महाविद्यालय, मुक्तांगण इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, सिंहगड कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, सेंट मीराज महिला महाविद्यालय, सेंट पॅट्रिक्स कनिष्ठ महाविद्यालय, सिम्बॉयसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भारतीय जैन संघटना, प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय