तेच रडगाणे आणि उद्घाटनाची प्रतीक्षा कायम

स्वातंत्र्यलढय़ात बलिदान देणाऱ्या क्रांतिवीर चापेकर यांचे चिरंतन स्मरण राहावे, यासाठी चिंचवडगावात त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय िपपरी महापालिकेने घेतला. मात्र, सहा वर्ष झाली तरी हा प्रकल्प रखडला आहे. विविध टप्प्यावर लाल फितीच्या विचित्र कारभाराचा फटका बसल्याने रखडलेल्या या प्रकल्पाची शुक्रवारी दिनेश वाघमारे यांनी पाहणी केली.

हुतात्मा दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर आणि महादेव गोविंद रानडे या क्रांतिवीरांचे पूर्णाकृती पुतळे उभारून त्यांचे समूहशिल्प चिंचवडगावात उभारण्यात येणार आहे.

२५ ऑगस्ट २०१० मध्ये स्मारकाच्या प्रकल्पाचे मोठा गाजावाजा करून भूमिपूजन झाले. मात्र, अजूनही काम पूर्ण झालेले नाही. कधी महापालिका, वाहतूक पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय तर कधी राज्य शासन अशा विविध टप्प्यांवर प्रकल्पाशी संबंधित कामे रखडल्याने हा विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. अजूनही केवळ ‘कागदी घोडे’ नाचवण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यानंतर १५ दिवसांत काम पूर्ण होईल, असे वर्षभरापासून सांगण्यात येत आहे. या संदर्भात कोणीही विचारणा केली, की लवकरच काम पूर्ण होईल, असे पालूपद प्रत्येक वेळी सांगितले जाते. प्रत्यक्षात, अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचे दिसून येते. या संदर्भात, आयुक्त वाघमारे यांनी या प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या चौथऱ्याची पाहणी केली.