दुचाकीस्वार चोरटे पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावून पसार

गेल्या काही वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात साखळी चोरटय़ांनी उच्छाद घातला होता. साखळी चोरटय़ांवरील कारवाईसाठी पोलिसांनी केलेल्या विविध उपाययोजना तसेच साखळीचोरटय़ांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) झालेली कारवाई यामुळे साखळी चोरटय़ांना जरब बसली. त्यामुळे शहरातील साखळी चोऱ्यांच्या घटना कमी झाल्या आहेत. साखळीचोऱ्या रोखण्यात पोलिसांना यश आले असले, तरी गेल्या काही महिन्यांत शहरात मोबाइल चोरटय़ांनी डोके वर काढले आहे. पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावणारी मोबाइल चोरटय़ांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे. गेल्या महिनाभरात पादचाऱ्यांकडील मोबाइल हिसकावण्याच्या गुन्ह्य़ात वाढ झाल्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.

शहरातील साखळीचोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. साखळीचोरीचे गुन्हे पोलिसांकडून जबरी चोरीच्या कलमाखाली नोंदवण्यात येतात. गेल्या महिनाभरात मोबाइलवर संभाषण करणाऱ्या पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण आहे. विशेषत: शिवाजीनगर भागात मोबाइल हिसकावण्याचे गुन्हे घडले आहेत. सध्या प्रत्येक जण स्मार्टफोनचा वापर करत आहेत. स्मार्टफोनची किंमत साधारणपणे दहा ते साठ हजार रुपयांपर्यंत आहे. साखळीचोरीच्या गुन्ह्य़ात पकडले जाण्याची भीती असल्याने चोरटय़ांनी मोबाइल हिसकावण्याचे गुन्हे करण्यास सुरुवात केली असावी. चोरलेले मोबाइल तीन ते चार हजार रुपयांमध्ये खरेदी केले जातात. पुणे शहरात मोठय़ा संख्येने परप्रांतीय कामगार आहेत. परप्रांतीय कामगारांना स्वस्त दरात मोबाइल विकले जातात.

चोरीचे मोबाइल विकत घेणारे विक्रेते मोबाइल ‘फॉरमेट’ करतात. मोबाइलमध्ये करण्यात आलेल्या तांत्रिक बदलांमुळे अशा मोबाइलचा शोध घेणे पोलिसांच्या दृष्टीने अवघड होते. शहरातून चोरीला गेलेल्या प्रत्येक मोबाइलचे स्थळ (लोकेशन) शोधणे, हे तसे अवघड काम आहे. कारण पोलिसांना अन्य गुन्ह्य़ांचा तपास करावा लागतो, अशी माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

साखळीचोरीच्या गुन्ह्य़ांप्रमाणे मोबाइल हिसकावण्याच्या गुन्ह्य़ांची स्वतंत्रपणे नोंद करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. साखळीचोरटय़ांकडून हिसकावण्यात आलेले दागिने सराफ व्यावसायिकांना विकण्यात येतात. पोलिसांकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सराफ व्यावसायिकांनी चोरीचे दागिने विकत घेऊ नयेत याबाबत पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे चोरलेले दागिने विकण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरटय़ांची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली आहे. सन २०१६ मध्ये पुणे शहरात मोबाइल हिसकावण्याचे एकवीस गुन्हे घडले होते. यंदाच्या वर्षी मार्च २०१७ अखेरीपर्यंत मोबाइल हिसकावण्याचे ११ गुन्हे घडले आहेत.

मोबाइल हिसकावण्याच्या आठवडाभरातील घटना

* १९ मे- वानवडीतील ऑक्सफर्ड व्हिलेज सोसायटीसमोर ॠषभ साळुंके (वय १९) याच्या हातातील पंधरा हजारांचा मोबाइल हिसकावून नेला.

*  २० मे- कामावरून घरी निघालेल्या रोहित कुलकर्णी (रा. विश्रांतवाडी) यांचा शिवाजीनगर भागात पीएमपी थांब्यानजीक मोबाइल हिसकावून नेला.

*  २१ मे- मोशी-आळंदी रस्त्यावर प्रतीक राठोड (वय १८, रा. डुडुळगाव, ता. हवेली) याच्या हातातील १८ हजार ९९० रुपयांचा मोबाइल संच हिसकावला.

*  २१ मे- वेधशाळा चौकात रात्री स्वप्निल कोर्टीकर (३१, रा. बावधन) यांच्या हातातील दहा हजार रुपयांचा मोबाइल हिसकावला.

*  २६ मे- फग्र्युसन रस्त्यावर नंदकुमार वामन (वय ४६) यांच्या खिशातील दोन मोबाइल हिसकावून चोरटे पसार.

शहरात मोबाइल हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकीस्वार चोरटय़ाचा साथीदार पादचाऱ्यांकडील मोबाइल हिसकावून चोरटे पसार होतात. गुन्हे शाखेकडून मोबाइल हिसकावणाऱ्या चोरटय़ांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा)