मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘उत्सवातील गणपती’ नसतो, अध्यक्षपदी असणाऱ्या व्यक्तीवर त्याचे स्वरूप अवलंबून असते, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी चिंचवडला व्यक्त केले. साहित्य संमेलन झाले, चार दिवस मिरवून झाले आणि पेपरला बातम्या आल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे कोणी समजू नये, असे सूचक विधानही त्यांनी केले.
पिंपरीतील नियोजित साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील विविध संस्था, संघटनांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या ‘संमेलन पूर्व संमेलना’चे उद्घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. माधवी वैद्य, सुनील महाजन, राजन लाखे, सचिन इटकर आदी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे उत्सवातील गणपती असतो, असा उल्लेख लोक करतात. मात्र तसे काही नसते. अध्यक्षपदावर कशाप्रकारची व्यक्ती असते, त्यावर अवलंबून असते. गेल्या वर्षी १० डिसेंबरला आपण अध्यक्षपदाची सूत्रे घेतली. वर्षभरात आपण २९१ सार्वजनिक कार्यक्रम केले. असे असेल तर अध्यक्ष गणपती वगैरे नसतो, हे मान्य करायला काही हरकत नाही. घुमानने दाखवून दिले की संमेलन संपले म्हणजे जबाबदारी संपली, असे होत नाही. पी. डी. पाटील यांनी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे, आपण सर्व जणही कटिबद्ध आहोत. सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले. आभार नितीन यादव यांनी मानले.
सगळे ‘पाटील’ शब्द पाळत नाहीत
सगळे पाटील दिलेले आश्वासन पाळत नाहीत. राजकारणातील ‘पाटील’ तर बिलकूल पाळत नाहीत, अशी टिपणी श्रीपाल सबनीस यांनी या वेळी केली. डॉ. पी. डी. पाटील तसे नाहीत. त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी साहित्यिक मेळावा घेण्याची सूचना आपण केली, त्यांनी तातडीने होकार दिला. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष अहंकारी असतो. मलाही पाहिजे तितक्या प्रमाणात अध्यक्षपदाचा अहंकार आहे, असेही विधान त्यांनी केले.