मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी  ‘चला हवा येऊ द्या’च्या लोकप्रियेतचा वापर

मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘सैराट’फेम ‘आर्ची’ आणि ‘परशा’च्या लोकप्रतियतेचा आधार घेतलेला असतानाच पिंपरी महापालिकेनेही ‘झी’ मराठी वाहिनीवर सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील कलावंतांचा उपयोग मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मतदानाची कमी टक्केवारी ही राज्य निवडणूक आयोगाची नेहमीची डोकेदुखी आहे. पिंपरी पालिका निवडणुकांमध्येही अपेक्षित टक्केवारी गाठली जात नाही. गेल्या काही निवडणुकांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. निवडणूक आयोगाने मतदानविषयक जनजागृतीसाठी ‘आर्ची’ व ‘परशा’ची लोकप्रियता ‘कॅश’ करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. त्याचवेळी, पिंपरी महापालिकेनेही ‘चल हवा येऊ द्या’च्या कलावंतांची हवा आजमावून घेण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात, टीम ‘चला हवा येऊ द्या’शी संपर्क केला असून त्यांच्याशी महापालिका अधिकाऱ्यांची प्राथमिक बोलणीही झाली आहे. या कलाकारांनी कोणता संदेश द्यावा याची संहिता तयार करण्यात येत असून त्याचे चित्रीकरणही लवकरच करण्यात येणार आहे. या माध्यमातून मतदानविषयक जनजागृती तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यापासून पालिकेने पथनाटय़, मेळावे, चर्चासत्र आदींच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. महाविद्यालयीन पातळीवर विविध उपक्रम राबवले जात आहेत. तरीही, आणखी टक्केवारी वाढावी म्हणून ‘चला हवा येऊ द्या’च्या लोकप्रियतेचा आधार पिंपरी पालिकेने घेतला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील लोकप्रिय कलावंतांच्या माध्यमातून मतदानाविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचा मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निश्चितपणे उपयोग होईल. यासंदर्भातील प्राथमिक चर्चा झाली आहे. जनसंपर्क विभाग त्या टीमशी संपर्कात आहे.

डॉ. यशवंत माने, मुख्य निवडणूक अधिकारी, िपपरी महापालिका