संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शुक्रवारी पुण्यात आगमन होत आहे. त्यामुळे शुक्रवारी पहाटे दोन्ही पालख्या पुण्याकडे निघणार असल्यामुळे त्यांच्या मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. पालखी जसजशी पुढे जाईल, त्यानंतर रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जातील. या काळात नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे अवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी शुक्रवारी आळंदी येथून दिघी मॅगझीन, विश्रांतवाडी, साप्रस चौकी, चौकी, चंद्रमा हॉटेल, डावीकडे वळून सादलबाबा चौक, उजवीकडे वळून संगमवाडी नवीन रस्त्याने पाटील इस्टेट चौक, डावीकडे वळून अभियांत्रिकी महाविद्यालय चौकात येईल. या ठिकाणापासून दोन्ही पालख्या सोबत पुण्यात प्रवेश करतील. या मार्गावरील वाहतूक पालखीच्या वेळी बंद केली जाणार आहे. संत तुकाराम महाराज यांची पालखी आकुर्डी येथून निघणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक बंद केली जाईल.
या दोन्ही पालख्या पाटील इस्टेट येथे एकत्र येणार आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, सिमला ऑफीस चौक, वीर चापेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गुडलक, खंडोजीबाबा, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोडय़ा विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, नाना पेठ पोलीस चौकी येथे आल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिर येथे मुक्काम करेल. तर, संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पालखी विठोबा येथे मुक्कामी असेल. त्यामुळे शुक्रवारी दुपारी बारानंतर आवश्यकतेनुसार पालखी मार्गावरील रस्ते बंद केले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

दोन हजार पोलिसांचा पालखीला बंदोबस्त
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी पुण्यात दाखल होत आहे. या पालखीसाठी पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालखीमधील भुरटय़ा चोऱ्या रोखण्यासाठी गुन्हे शाखेची काही खास पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच, २१ ठिकाणी वॉच टॉवर, १२ पोलीस मदत केंद्र, नऊ शीघ्र कृती दलाची पथके, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकडय़ा, बॉम्ब शोधक व नाशक विभागाची सात पथके, ९ पोलीस उपायुक्त, पंधरा सहायक पोलीस आयुक्त, ७३ पोलीस निरीक्षक, १७४ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आणि दीड हजार पोलीस कर्मचारी पालखी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली.