तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात आणि तुम्हाला असलेल्या आजार बरा करण्याबाबत कोणी अनोळखी व्यक्ती मार्ग सांगत असेल तर सावधान.. महर्षिनगर येथील एका व्यक्तीला नुकताच असा अनुभव आला. त्यांच्या मुलीच्या अंगावरील पांढरे डाग नाहीसे करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने एका आयुर्वेदिक दवाखान्यात जाण्यास सांगितले. तेथे दोन महिन्यांत तुमच्या मुलींचे पांढरे डाग नाहीसे होतील आणि नाही झाले तर पैसे परत केले जातील, असे सांगून ९४ हजार रुपयांची औषधे देण्यात आली. मात्र, पाच महिने झाले तरी डाग गेले नाहीत आणि तो दवाखाना चालविणाऱ्या महिला पसार झाल्या. हा सगळा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर अखेर पोलिसांकडे धाव घ्यावी लागली.
महर्षिनगर येथे राहणारा एका व्यापारी काही महिन्यांपूर्वी कुटुंबीयासोबत निगडी येथील अप्पूघर या ठिकाणी फिरण्यासाठी गेला होता. त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावर पांढरे डाग आहेत. त्यांना तेथे एक माणूस भेटला. त्याने त्यांना सांगितले, ‘तुमच्या मुलीप्रमाणेच माझ्या बहिणीच्या शरीरावर पांढरे डाग होते. मात्र, शिवाजीनगर येथील ओम साई आयुर्वेदिक येथून औषधोपचार केल्यावर ते डाग निघून गेले.’ यावर या व्यापाऱ्याने त्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक घेतला. पुढे सातआठ दिवसांनी त्या व्यक्तीला त्यांनी फोन केला, तेव्हा त्या व्यक्तीची बहीण या व्यापाऱ्याला भेटायला आली. तिने काही औषधे दिली आणि इतर औषधांसाठी दवाख्यान्यात यावे लागेल, असे सांगितले.
त्यानंतर हा व्यापारी त्या महिलेसोबत शिवाजीनगर भागातील रजनीगंधा इमारतीत असलेल्या दवाखान्यात गेला. तेथे ओम साई आयुर्वेदिक या नावाचा दवाखाना होता. तिने तेथून नऊदहा प्रकारची औषधे घेतली. ती कशी घ्यायची हे सांगितले. या औषधांचे बिल एकूण ९४,५४४ रुपये झाल्याचे सांगितले. ओम साई आयुर्वेदिक दवाखान्यातील दोन महिलांनी ओसवाल यांना सांगितले, की दोन महिन्यांत या औषधांनी बरे न वाटल्यास संपूर्ण रक्कम परत केली जाईल. या व्यापाऱ्याकडे त्या वेळी एवढी रक्कम नसल्याने त्याने पन्नास हजार रुपये दिले. उरलेले ४४ हजार रुपये एक महिला घरी येऊन घेऊन गेली. ही औषधे नियमितपणे घेऊनही पाच महिन्यांनंतरही त्यांच्या मुलीच्या अंगावरील पांढरे डाग कमी झाले नाही. त्यामुळे हा व्यापारी ओम साई आयुर्वेदिक या दवाखान्यात गेला. मात्र, तो बंद असल्याचे आढळून आले. हा दवाखाना एका महिन्यापासूनच बंद झाल्याचे शेजारच्या व्यक्तींनी सांगितले. या दवाखान्यातून देण्यात आलेला क्रमांकही बंद होता. त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे या व्यापाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. व्ही. जाधव यांनी सांगितले, की ओम साई आयुर्वेदिक दवाखान्याकडून झालेल्या फसवणुकीच्या संदर्भात तक्रार अर्ज आला आहे. या तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.