बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मिठाई किंवा खवा खरेदी करताय?..जरा जपून! उत्सवकाळात मोठय़ा प्रमाणावर खव्याची उलाढाल होत असल्यामुळे अनेक दिवसांपासून कोल्ड स्टोरेजमध्ये साठवलेला शिळा खवा बाजारात येण्याची शक्यता असते. शिळा खवा-मिठाई आणि भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने या वस्तूंचे विक्रेते आणि दुधाची वाहतूक करणारे टँकर यांच्या तपासणीची मोहीम सुरू केली आहे. जी गणेश मंडळे प्रसाद बनवून विकतात किंवा त्याचे वाटप करतात त्यांनाही प्रसादाच्या दर्जाबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.
अन्न विभागाचे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘अनेक गणेश मंडळे लाडू किंवा इतर मिठाईचा प्रसाद स्वत: बनवून त्याचे वितरण करतात. अशांनी एफडीएचा परवाना घेणे आवश्यक असून प्रसाद बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा मालही परवानाधारक किंवा नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रसादासाठी खव्याचा वापर होत असल्यास विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. प्रसाद तयार करण्याची जागा तर स्वच्छ असावीच, पण प्रसाद बनवणाऱ्या स्वयंसेवकानेही स्वच्छता पाळावी.’’
दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची साठवणूक करावी लागल्यास हे पदार्थ ४ अंश सेल्सियस अथवा त्याहून कमी तापमानावर साठवावेत आणि या पदार्थाच्या वाहतुकीसाठीही रेफ्रिजरेटेज वाहन वापरावे, असेही एफडीएने सांगितले आहे. मिठाई विक्रेत्यांनी बाहेरून आलेली मिठाई न विकता त्यांनी स्वत: खवा-मिठाई बनवून विकली तर उत्तम, असेही संगत म्हणाले. गेल्या वर्षी गणेशोत्सवात दोन ठिकाणी गुजरातमधून आलेली सुमारे दीड लाख रुपयांची बर्फी जप्त करण्यात आली होती. या बर्फीच्या नमुन्यांचे विश्लेषण केले असता त्यात दूध पावडर व पाम तेलाचा वापर केलेला आढळला होता. या पाश्र्वभूमीवर ही सूचना देण्यात आली आहे.
खवा-मिठाईबाबत काय दक्षता घेणे आवश्यक?
– शिळा व अनेक दिवसांपासून साठवलेला खवा टाळा.
– दूध आणि दुग्धजन्य पदार्थ साठवायचेच असतील, तर ते ४ अंश सेल्सियस किंवा त्याहून कमी तापमानावर साठवा.
– खव्याची वाहतूकही रेफ्रिजरेटेड वाहनातूनच करा.
– परराज्यातून आलेली आणि घटक पदार्थाचा उल्लेख नसलेली मिठाई टाळा.
– एका वेळी आवश्यक तेवढय़ाच प्रसादाचे उत्पादन करून शक्य तेवढय़ा लवकर त्याचे वितरण करा.