फुले आणि शाहुंची केवळ स्मारके उभारायची आणि प्रत्यक्षात मात्र त्यांच्या वैचारिक मांडणीच्या विरुद्ध वागायचे, ही लोकांची फसवणूक असल्याचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांविषयीचा आदर प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून व्यक्त झाला पाहिजे, असेही यावेळी भुजबळांनी सांगितले. पुण्यात महात्मा फुले समता पुरस्कार सोहळ्यावेळी ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांच्या विधानाविरोधात ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. एकीकडे फुले आणि आंबेडकरांचे पुतळे आणि स्मारके उभारायची आणि दुसरीकडे त्यांच्याच विचाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समता परिषदेच्या कार्यक्रमात निदर्शने करायची, असे वागण्यात काहीच अर्थ नाही. हे म्हणजे दलित, ओबीसी आणि आदिवासींची फसवणूक करण्यासारखे आहे. अशाप्रकारची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, हे बिहारच्या निकालांवरून सिद्ध झाले आहे. त्याची पुनरावृत्तीदेखील होऊ शकते. जे लोक वादग्रस्त बोलतात त्यांना मोदींकडून समज दिली जात नाही. त्यामुळे या सगळ्याला त्यांचाही पाठिंबा आहे, अशी भावना समाजात निर्माण होण्याची शक्यता असल्याचे यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटले.