जिल्ह्य़ातील नगरपालिका प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्र्यांचे ‘मोदी कार्ड’च

राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात मिळालेल्या यशामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास व उत्साह कमालीचा दुणावला आहे. १४ डिसेंबरला होणाऱ्या पुणे जिल्ह्य़ातील नगरपालिका निवडणुकांसाठी त्यांनी शनिवारी जिल्ह्य़ाचा धावता दौरा केला. नगरपालिकांमध्ये असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराचे वाभाडे काढतानाच मोदी सरकारची कामगिरी, नोटाबंदीमुळे भविष्यात येणारे चांगले दिवस आदी मुद्दय़ांवर त्यांनी भर दिला. ‘आपण दोघे भाऊ, वाटून-वाटून खाऊ’ असा नगरपालिकांमध्ये होत आलेला कारभार भाजपकडे सत्ता आल्यानंतर चालणार नाही, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.

पुणे जिल्हयातील नगरपालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांनी लोणावळा, आळंदी, तळेगावात जाहीर सभा घेतल्या. पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे आदींसह स्थानिक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. नगरपालिकांसाठी हवा तितका निधी देण्याची राज्यसरकारची तयारी असून गुणवत्तापूर्ण, गतिमान व पारदर्शक कारभाराची ग्वाही देऊन मुख्यमंत्री म्हणाले,की २०११ च्या जनगणनेनंतर नागरीकरणाचे वास्तव समोर आले. राज्यातील ११ कोटी २० लाख लोकसंख्येतील साडेपाच कोटी जनता विविध ३०० छोटय़ा-मोठय़ा शहरांमध्ये राहते. आतापर्यंत वाढत्या नागरिकीकरणाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे शहरे वाढली, गावे ओस पडली. शहरांमध्ये बकालपणा आल्याने नागरी व्यवस्था कोलमडली. शहरी जीवनमान खालावले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरीकरण अभिशाप नसून संधी असल्याचे दाखवून दिले. शहरविकासाच्या अनेक योजना राबवत मोदींनी शहरांसाठी वित्तीय व्यवस्था उपलब्ध करून दिल्या. दीड वर्षांत ३०० पैकी १०० शहरे हागणदारीमुक्त केली. पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, नदी प्रदूषण, गरिबांसाठी घरे अशा विविध विषयांवर आश्वासक प्रतिसाद दिला. नोटाबंदी केल्यापासून नागरिकांना त्रास होतो आहे. मात्र, पुढे चांगले दिवस येतील. मोदी यांनी आर्थिक क्रांती केली असून ११ लाख कोटी रूपये देशाच्या बँकांमध्ये आले आहेत. या निधीतून जनहिताची अनेक चांगली कामे होणार आहेत. देश बदलतोय, त्याची प्रक्रिया मोदींनी सुरू केली आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.