साने चौक ते चिखलीपर्यंतचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून गेल्या सहा महिन्यात या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये सात बळी गेले आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून या रस्त्याचे रुंदीकरण रखडल्यामुळे वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.

थरमॅक्स चौक ते चिखलीपर्यंतचा रस्ता विकास आराखडय़ामध्ये ३० मीटर रुंदीचा आहे. थरमॅक्स चौकापासून साने चौकापर्यंत या रस्त्याचे रूंदीकरण झाले आहे. मात्र तेथून पुढे या रस्त्याचे रूंदीकरण रखडले आहे. देहू-आळंदी, चाकण आदी भागाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. कारखान्यांमध्ये कामासाठी जाणाऱ्या चाकारमान्यांमुळे या रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळच्या वेळी मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. १९७७ मध्ये या भागाचा समावेश महापालिकेत झाल्यानंतर नागरीकरण मोठय़ा झपाटय़ाने झाले आहे. या भागाची लोकसंख्याही दिवसेंदिवस झपाटय़ाने वाढत आहे.

साने चौक ते चिखली या रस्त्यावर पंधरा दिवसांपूर्वी साने चौकाच्यापुढे एका कामगाराचा अपघातामध्ये मृत्यू झाला. तसेच दोन महिन्यांपूर्वी केशवनगर, नेवाळे वस्ती येथे वेगवेगळ्या घटनात चार अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. तर चिखली चौकात झालेल्या अपघातामध्ये एका वाहनचालकाचा बळी गेला होता. येथील २४ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी राजकीय मंडळींची इच्छा नसल्याने या रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याचे येथील स्थानिक नागरिक सांगतात.

साने चौक ते चिखली हा रस्त्याचे रुंदीकरण करावे यासाठी मी अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहे. मात्र, शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यासाठीची जागा ताब्यात येणार नाही. शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन रस्त्याचे रुंदीकरण लवकर करावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.

दत्ता साने, नगरसेववक, चिखली