बालकांचे हक्क, शिक्षण हक्क कायदा, बालकामगारविरोधी कायदा या सगळ्याची पायमल्ली करत अजूनही हॉटेल्स, छोटय़ा खाणावळी या ठिकाणी लहान मुलांकडून काम करून घेतले जात आहे. ‘येथे बालकामगार नाहीत,’ असा फलक दिवसा लावायचा आणि रात्री बालकांकडून काम करून घ्यायचे असा नवा पायंडा दिसून येत आहे. बालहक्क कृती समितीने विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये महिनाभराच्या कालावधीत १५ बालकामगारांची सुटका करण्यात आली.
कोणत्याही आस्थापनात, हॉटेल, कारखाने अशा कोणत्याही ठिकाणी बालकांना कामगार म्हणून ठेवणे गुन्हा आहे. गेली अनेक वर्षे बालकामगार असू नयेत म्हणून विविध पातळीवर जनजागृती मोहिमाही चालवण्यात येतात. ‘येथे बालकामगार नाहीत’ असे जाहीर करणेही बंधनकारक आहे. त्याप्रमाणे दिवसा अशा पाटय़ा लावून प्रत्यक्षात सायंकाळनंतर लहान मुलांकडून काम करून घेण्याचे प्रकार आता समोर येत आहेत. नियमित कामगारांपेक्षाही कमी पगार या मुलांना देण्यात येतो. त्यांच्याकडून अगदी दहा-अकरा तासही काम करून घेतले जाते. वेटर किंवा लोकांसमोर येईल अशी कामे या मुलांना दिली जात नसल्यामुळे ते लक्षातही येत नाहीत. यातील बहुतेक मुले शिक्षणापासूनही वंचित राहतात.
बालहक्क कृती समिती या स्वयंसेवी संस्थेने गेल्या महिनाभरांत विविध हॉटेल्स, अमृततुल्य अशा ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये १५ बालकामगारांची सुटका करण्यात आली. कोंढवा परिसरातील ५ हॉटेल्स, सारसबागेजवळील खाण्याच्या टपऱ्या यांठिकाणी हे छापे घालण्यात आले होते. कोंढव्यातील छाप्यांमध्ये सापडलेली काही मुले ही १४ वर्षांपेक्षाही कमी वयाची आहेत. त्यांच्याकडून दुपारी ३ ते रात्री १२ पर्यंत काम करून घेतले जात होते आणि त्याबदल्यात ३ किंवा ४ हजार रुपये पगार दिला जात होता. रात्री हॉटेल्स, बार यांठिकाणी काम करत असलेली मुले लक्षात येत नाहीत, अशी माहिती बालहक्क कृती समितीचे कार्यकर्ते झईद सय्यद यांनी दिली.
स्थानिक दादा, भाई, नगरसेवकांकडून त्रास
‘बहुतेक ठिकाणी हॉटेल्सना स्थानिक नेते, गुंड यांचा पाठिंबा असतो. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांकडूनही छापे घालण्यासाठी टाळाटाळ करण्यात येते. एकदा बालकामगारांची सुटका केली, तरी काही दिवसांनी त्या ठिकाणी पुन्हा नवी मुलेही दिसतात. छापा घालू नये म्हणून आमच्यावरही स्थानिक गुंड आणि नेत्यांकडून दबाव आणला जातो. ‘मुलांना पैसे मिळातात. मग तुम्हाला काय अडचण आहे’ असा युक्तिवाद त्यांच्याकडून केला जातो,’ असे बालहक्क कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.