वारजे येथील पेरूच्या बागेत झालेला अडीच वर्षांच्या बालिकेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या बालिकेच्या आईच्या प्रियकरानेच हा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. खून केल्यानंतर हा तक्रार देण्यासाठी स्वत: पोलीस ठाण्यात गेला होता. पण, त्या ठिकाणी मुलीबाबतची बेगडी माया दाखवितानाच्या संशयास्पद हालचाली पोलिसांनी टिपल्या आणि त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्य़ाचा छडा लावला. मुलीची आई त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याने चिडून हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
ज्ञानेश्वर भारत आदमाने (वय २६, रा. दांगट पाटील इस्टेट, शिवणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत विशाखा प्रविण सोनवणे (वय- अडीच वर्षे, रा. रामनगर, वारजे) हिचा खून झाला होता. याप्रकरणी तिचे वडील प्रविण सोनवणे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखाचे वडील हे वारजे भागातील एका जीममध्ये कामाला आहेत. तर आई ही गृहिणी आहे. विशाखाचे वडील हे पहाटे बाहेर कामासाठी पडले. त्यानंतर साडेसातच्या सुमारास विशाखा खेळण्यासाठी बाहेर पडली. मात्र, नऊ वाजले तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे नातेवाईकांच्या मदतीने आईने विशाखाचा शोध घेतला. पण, ती न सापडल्यामुळे विशाखाची आई, तिची चुलत बहीण आणि तिचा दीर ज्ञानेश्वर आदमाने हे माळवाडी पोलीस ठाण्याच्या अंकित असलेल्या रामनगर पोलीस चौकीत ती हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेले. विशाखा हरवल्याची तक्रार नोंदवून घेण्याचे काम सुरू असतानाच चौकीत एक फोन आला. पेरूच्या बागेत एका बालिकेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती एका व्यक्तीने दिली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक व विशाखाची आई त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी विशाखाला ओळखले. विशाखाच्या अंगावर जखमा होत्या आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती. त्यामुळे तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेजारी रक्ताने माखलेला दगड पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्य़ाचा तपास सुरू असताना पोलिसांना विशाखाच्या आईसोबत आलेला व्यक्ती आदमाने याच्यावर संशय आला. तो चौकीत विशाखाबाबत रडून बेगडे प्रेम दाखवित होता. त्याचे हावभाव पोलिसांना संशयास्पद वाटल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तरीही तो आव आणून ‘मला गुड्डूराणीकडे जाऊ द्या, मला एकदा तरी तिला पाहू द्या’ असे म्हणत होता. पण, गुन्ह्य़ाची कबुली देत नव्हता. पोलिसांनी त्याची अधिक माहिती काढली असता त्याचे व विशाखाच्या  आईचे प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून विशाखाची आई त्याला झिडकारत होती. नातेवाईक व त्याच्या मित्रांसमोर अपमान करून प्रेमाला प्रतिसाद देत नव्हती. त्याचा राग आदमानेला होता. त्यामुळे त्याने विशाखाचे बुधवारी सकाळी तिच्या घराजवळून अपहरण केले. पेरूच्या बागेमध्ये नेऊन तिच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी करून तिचा खून केला. पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी अल्पावधीतच अत्यंत कौशल्याने आरोपीला अटक केली.