आपल्या लाडक्या गणरायाचे आगमनास थोडाच कालावधी राहिला असून यासाठी पुणे शहरात जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘मन की बात’मध्ये नागरिकांना शाडू मातीच्या मुर्ती घरोघरी बसवण्याची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत आज पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग़ या शाळेतील तब्बल २ हजार मुलांनी शाडू मातीच्या सहाय्याने पर्यावरणपुरक गणेशमुर्ती साकारल्या.

पुण्यात आज रमणबाग़ शाळेत तब्बल २ हजार १६३ विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक शाडू मातीची मूर्ती तयार करण्याचा एक अनोखा विक्रम केला आहे. तर दरवर्षी स्टॉलवर जाऊन बाप्पाची मूर्ती खरेदी करणाऱ्या या मुलांनी आज स्वतः मुर्ती तयार केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता.

या उपक्रमाबाबत शिल्पकार अभिजीत धोंडफळे म्हणाले, “दरवर्षी प्रत्येकाच्या घरामध्ये बाप्पा विराजमान होतो. या बाप्पाच्या मुर्ती ‘प्लास्टर ऑफ परिस’च्या असतात. त्या मुर्तींचे पाण्यात विसर्जन केल्यास पर्यावरणाला घातक असून त्या पार्श्वभूमीवर आज तब्बल २ हजार १६१ विद्यार्थ्यांनी शाडू मातीची मूर्ती बनवल्याने यातून पर्यावरणाचे रक्षण होणार आहे”. पंतप्रधानाच्या ‘मन की बात’मधील अवाहनाला बच्चे कंपनीने चांगला प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी एक विद्यार्थी हषवर्धन शेट्टी म्हणाला, “मी पहिल्यांदाच गणपती तयार केला असून त्याचा एक वेगळा आनंद आहे. ही मुर्ती तयार करण्यास मला अर्धा तास लागला. त्याचबरोबर दरवर्षी बाप्पाची मुर्ती तयार करणार आणि घरी विराजमान करणार”.