दिवाळीच्या सुट्टय़ा सुरू झाल्या आहेत आणि आता मुलांची पावले वळत आहेत ती वेगवेगळ्या शिबिरांकडे. पणत्या रंगवणे, आकाशकंदील करणे यासारख्या घरगुती स्वरूपात घेतल्या जाणाऱ्या शिबिरांपासून ते परदेशात घेतल्या जाणाऱ्या पंचतारांकित सुविधा असलेल्या शिबिरांपर्यंत अशी मोठी बाजारपेठच उभी राहिली आहे. ऑनलाईन क्लासिफाईड्स, पत्रके या माध्यमातून संस्थांनी शिबिरांची जाहिरातबाजी चालवली आहे.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये मिलिटरी स्कूलमध्ये चालणारी शिबिरे किंवा एखादा घरगुती स्वरूपात चालवण्यात येणारा छंदवर्ग.. एवढय़ा पुरतीच मुलांची सुट्टी आता मर्यादित राहिलेली नाही. वेगवेगळ्या धाडसी खेळांचे प्रशिक्षण देणारी शिबिरे, व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे यांचे पेवच सध्या फुटले आहे. आजूबाजूच्या परिसराची थोडीफार माहिती आणि मुलांच्या राहण्या-जेवणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा या भांडवलावर शिबिरे सुरू केली जात आहेत. मात्र, त्याचबरोबर ही बाजारपेठ पाहून धाडसी खेळांचे प्रशिक्षण देणाऱ्या काही परदेशी संस्थांनीही या बाजारपेठेत उडी घेतली आहे.
साधारण दोन किंवा तीन दिवसांपासून ते ८ दिवसांपर्यंत विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अगदी २ हजार रुपयांपासून ते लाखभर रुपयांचे शुल्क या शिबिरातून आकारण्यात येत आहे. अगदी थायलंड, साऊथ आफ्रिका असेही पर्याय उपलब्ध आहेत. पुणे परिसरातून कोकण, पुण्याच्या जवळील कोलाड, ताम्हिणी घाट, आंबोली परिसर या भागातील शिबिरांना पसंती मिळाली आहे. ५ ते १५ वर्षे या वयोगटासाठी ही शिबिरे भरवण्यात येत आहेत. शासनाने धाडसी खेळांच्या प्रशिक्षण शिबिरांसाठीचे निकष कडक केले. त्याचा परिणाम या सुट्टीतील शिबिरांनाही झाला आहे. वयाची अट असल्यामुळे मुलांचा प्रतिसाद कमी झाल्याचे संचालकांनी सांगितले. मात्र, अनेकदा या शिबिर चालकांकडून हे नियम सर्रास धाब्यावर बसवण्यात येत असल्याचे समोर येत आहे. त्याचप्रमाणे अनेक शिबिरांची किंवा ती घेणाऱ्या संस्थांची अधिकृत नोंदणीही नाही. त्यामुळे शिबिरांची संख्याही अनियंत्रित होत चालली आहे. काही संस्थांनी पुण्यातील काही शाळांशीही संधान साधले आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात शाळांकडूनही या शिबिरांच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतात. त्याचप्रमाणे ऑनलाईन क्लासिफाईड्स, पत्रके या माध्यमातून या शिबिरांची जाहिरातबाजी सुरू आहे.

‘‘मुलांना पंधरा दिवस सुट्टी असते. मात्र, तेवढा वेळ ऑफिसला सुट्टी मिळत नाही. त्यामुळे या शिबिरांना पाठवणे योग्य वाटते. त्याचप्रमाणे मुलेही नवे काहीतरी शिकतात. सुरक्षेचे उपाय असणे गरजेचे आहे. शिबिराला पाठवण्यापूर्वी त्याबाबत खात्री करून घेणे चांगले.’’
– नेहा रासकर, पालक

iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
nashik district apmc auction stopped
आजपासून नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव बंद; हमाली, तोलाई वाद