स्थानिक रहिवाशांची मागणी नसताना आणि अस्तित्वातील रस्ते अतिशय चांगल्या स्थितीत असतानाही सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा घाट शहरात जागोजागी घालण्यात आला असून चांगले, डांबरी रस्ते उखडून सध्याच्या अनेक चांगल्या रस्त्यांची वाट लावली जात आहे. स्थानिक रहिवासी या रस्त्यांबाबत सातत्याने आवाज उठवत असले, तरी फक्त सिमेंटच्याच रस्त्यांमध्ये महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना रस असल्यामुळे नागरिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सेनापती बापट रस्त्यालगतच्या हनुमाननगर, तसेच श्रीकृष्णनगर, शैलेंद्र सोसायटी येथील सिमेंटच्या रस्त्यांचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. या कामावर तीन कोटी रुपये खर्च होणार असून या भागातील चांगले डांबरी रस्ते उखडून हे काम हाती घेण्यात आले आहे. वास्तविक अशा प्रकारचे काम सुरू करण्यापूर्वी स्थानिक सोसायटय़ांमधील नागरिकांची बैठक महापालिका अधिकाऱ्यांनी वा लोकप्रतिनिधींनी घेतली असती, तर कोणीच या रस्त्यांची मागणी केली नसती. मात्र कोणतीही गरज नसताना अस्तित्वातील रस्ते उखडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या भागातील काही रस्त्यांची, पावसाळी गटारांची आणि डांबरीकरणाची कामे नुकतीच करण्यात आली होती. ते रस्तेही उखडण्यात आले आहेत.
सिमेंट रस्त्यांना येणारा खर्च डांबरी रस्त्यांच्या खर्चापेक्षा तीनपट अधिक असून हे रस्ते केल्यानंतर त्याच्या कडेने जे पेव्हर ब्लॉक बसवावे लागतात त्यांचा खर्च डांबरी रस्त्याच्या कडेने जे पदपथ बांधले जातात त्या खर्चाच्या तीनपट आहे. ज्या भागात दाट लोकवस्ती आहे अशा भागात तसेच जेथे पाणीपुरपठा, सांडपाणी, टेलिफोन, वीज आदींच्या वाहिन्या आहेत तेथे या रस्त्यांचा उपयोग होत नाही. ज्या भागात रहदारी मोठी आहे, जड वाहनांची वाहतूक जेथून होते तेथे सिमेंट काँक्रिटचे रस्ते फायदेशीर ठरतात. डांबरी रस्ता खराब झाला तरी त्याच्यावर डांबराचा नवा थर देऊन तो दुरुस्त करता येतो. ही वस्तुस्थिती असली, तरी सिमेंट रस्त्यांचे काम ठिकठिकाणी हाती घेतले जात आहे. सिमेंटचे रस्ते केले जात असताना कडेने जे पदपथ करण्यात आले आहेत त्यांची अवस्था अनेक भागात अत्यंत वाईट झाली आहे. मात्र त्याकडेही महापालिका प्रशासनाचे लक्ष नाही.
आमच्या भागातील ड्रेनेज लाईनचे काम चाळीस वर्षांपूर्वी करण्यात आले. त्या नवीन टाकणे आवश्यक आहे. पाणी वाटपही समान पद्धतीने होत नाही. अनेक घरांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरते. सिमेंटचे रस्ते केले जात असल्यामुळे आता संपूर्ण रस्ता सात ते आठ इंचाने उंच होणार असून घरांमध्ये पाणी शिरण्याची समस्या वाढणार आहे. स्थानिक परिस्थितीचा विचार करून नागरिकांची बैठक बोलवावी, चर्चा करावी आणि सध्या सुरू असलेले सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे काम थांबवावे, अशी मागणी सतीश चितळे यांच्यासह स्थानिक साठ नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
असे आहेत आक्षेप..
* आठ, दहा फूट रुंदीच्या रस्त्यांचेही काँक्रिटीकरण
* नागरिकांना विश्वासात न घेता कामांचा सपाटा
* रहिवाशांचा विरोध असताना गल्ली-बोळांचे काँक्रिटीकरण
* सिमेंट रस्त्यांबरोबरच पेव्हर ब्लॉकच्या पदपथांचीही कामे