पूर्वी गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून विकसित झालेले अभिजात संगीत सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये घरबसल्या शिकण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. संगीत शिक्षणाची पारंपरिक गुरुकुल पद्धत आणि आभासी वर्ग (व्हच्र्युअल क्लासरूम) या दोन्हीचा संगम असलेला अभिनव प्रयोग प्रथमच होत असून तो गानविश्वातील प्रख्यात पुणे भारत गायन समाज या संस्थेने मूर्त स्वरूपात आणला आहे.
संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयातर्फे चालविला जाणारा शास्त्रीय संगीताचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम प्रत्येकी दोन डीव्हीडीमध्ये चित्रित करून जतन करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये सावनी दातार-कुलकर्णी हिने शास्त्रीय संगीत आणि शिल्पा दातार-पुणतांबेकर हिने सुगम संगीत शिकविले आहे. पं. भास्करबुबा बखले यांच्या पणती असलेल्या या युवा गायिकांचे योगदान या प्रकल्पाला लाभले असून समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना या दोघी संगीत शिकवीत आहेत, अशा स्वरूपाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. वर्षभराचा अभ्यासक्रम दोन डीव्हीडी संचामध्ये चित्रित केला असून शास्त्रीय संगीताबरोबरच भास्करबुवांच्या परंपरेतील सुगम संगीत गायनकलेचा आनंद अभ्यासकांना मिळणार आहे. या डीव्हीडी संचाबरोबर त्या त्या वर्षीच्या अभ्यासक्रमाचे पुस्तकही विनामूल्य देण्यात येणार आहे.
‘आपल्याकडे संगीत शिकविणारे आहेत. पण, त्यांच्याकडे शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम शिकविण्याची पद्धती नाही. ती उणीव दूर करण्याबरोबरच शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार हे यामागचे उद्दिष्ट आहे. केवळ संगीत शिकणारे विद्यार्थीच नव्हेत, तर शास्त्रीय संगीताचे रसिकही या डीव्हीडीद्वारे संगीत शिक्षण आणि श्रवणाचा आनंद लुटू शकतात. याच धर्तीवर संगीत विशारद आणि संगीत पारंगत या अभ्यासक्रमासह संवादिनी आणि तबलावादनाचा अभ्यासक्रमही डीव्हीडीद्वारे चित्रित करून ठेवण्यात येणार असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य सुहास दातार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या पुणे भारत गायन समाज संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयातर्फे शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले जाते. संस्थेच्या संगीत अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये ही भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत. शहराचा विस्तार झाल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही संगीत शिकण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. त्याचा परिणाम विद्यालयावरही झाला आहे. पूर्वी विद्यालयामध्ये सहा दिवस संगीत शिक्षणाचा अभ्यासक्रम होत असे. मात्र, आता आठवडय़ातून जेमतेम दोन-तीन दिवस संगीताचे वर्ग चालतात. संगीत शिकण्याची आस आहे, पण त्यासाठी विद्यालयामध्ये येणे जमत नाही, अशा विद्यार्थ्यांना घरबसल्या संगीत शिक्षणाचे योग्य मार्गदर्शन मिळावे हा या प्रकल्पामागचा उद्देश आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा शैला दातार यांनी दिली.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा