नगरसेवकांच्या तक्रारीनंतर पिंपरी पालिका आयुक्तांची तंबी

पिंपरीचिंचवड शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून पालिकेचे अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याची गंभीर दखल घेतली. कचरा तसेच स्वच्छतेच्या कामात त्रुटी आढळून आल्यास संबंधित भागातील मुकादम आणि आरोग्य निरीक्षकावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच आयुक्तांनी दिली आहे.

शहरातील आरोग्यविषयक कामांचा आढावा आयुक्त हर्डीकर यांनी एका बैठकीत घेतला. उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, शर्मिला बाबर, सहआयुक्त दिलीप गावडे, नगररचना उपसंचालक प्रशांत ठाकूर, सहशहर अभियंता प्रवीण तुपे, आरोग्य कार्यकारी अधिकारी विजय खोराटे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, मनोज लोणकर, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी आदी बैठकीत उपस्थित होते. या वेळी नगरसेवकांनी आपापल्या भागातील कचऱ्याची तसेच स्वच्छतेची समस्या असल्याचे नमूद केले.

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, की वेळच्या वेळी कचरा उचलला जात नसल्याने शहरात कचऱ्यांचे ढीग साचू लागले आहेत. कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या गाडय़ाच नादुरूस्त असल्याचे आढळून येत आहे. त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत नाही. प्रत्येक प्रभागातील कचऱ्याची समस्या वाढली आहे, त्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. लोकप्रतिनिधींच्या तक्रारींचा आढावा घेतल्यानंतर आयुक्त म्हणाले, की कचरा वेळच्या वेळी उचलला जाईल, कचरा गाडय़ा नादुरूस्त होणार नाहीत, याची अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. स्वच्छतेच्या कामात हयगय केल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.