गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प; निविदा प्रक्रिया रखडल्याचा परिणाम

प्रभागातील झाडणकामांसाठीच्या निधीमध्ये करण्यात आलेली कपात आणि झाडणकामांची स्वयंचलित यंत्रांच्या रखडलेल्या खरेदीमुळे प्रभागातील स्वच्छतेच्या कामांच्या निविदाच निघाल्या नसल्याची बाब पुढे आली आहे. स्वच्छताविषयक कामांसाठी निविदा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे निधीच नसल्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रभागातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली असून झाडणकामांसाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावाधाव सुरु झाली आहे.

शहरातील प्रभागांमध्ये महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत विविध प्रकारची स्वच्छता विषयक कामे केली जातात. विशेषत: झाडणकामांसाठी अंदाजपत्रकात क्षेत्रीय कार्यालयांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात येते. खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून ही कामे करण्यात येत असून ठेक्याची मुदत संपल्यानंतर त्याची निविदा प्रशासनाकडून काढण्यात येते. कंत्राटी स्वच्छता सेवकांच्या माध्यमातून दैनंदिन साफसफाईची कामे करण्यात येतात.

मात्र यंदाच्या अंदाजपत्रकात क्षेत्रीय कार्यालयांना दिलय़ा जाणाऱ्या निधीमध्ये कपात करण्यात आली. खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून शहरात स्वच्छतेची कामे करण्याऐवजी स्वयंचलित यंत्रांची खरेदी (स्विपींग मशीन्स) करण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण शहराच्या स्वच्छतेसाठी पाच ते सहा स्वयंचलित यंत्रे खरेदी करण्यासाठीची प्रक्रियाही ऑगस्ट अखेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र ही खरेदी काही कारणांमुळे रखडली. झाडणकामांसाठी यंत्रांची खरेदी होणार असल्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात येणारी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची आर्थिक तरतूद दीड कोटी रुपयांच्या आसपास आणण्यात आली. या दीड कोटी रुपयांतूनच क्षेत्रीय कार्यालयांकडून काही कालावधी पुरती निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम संपूर्ण शहरात जाणवण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश प्रभागातील निविदांची मुदत संपुष्टात आल्यामुळे ही कामे ठप्प झाली असून दैनंदिन साफसफाईही मनुष्यबळाअभावी रखडली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि क्रिएटिव्ह फौउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनीही ही बाब आयुक्त कुणाल कुमार यांच्या निदर्शनास आणली आहे.

या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडे तक्रारी येण्यास सुरूवात झाली. मात्र निधी नसल्यामुळे निविदा प्रक्रिया राबविण्यास प्रशासनाला अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत शहर स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या कालावधीत स्वच्छतेच्या कामांचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे काही क्षेत्रीय कार्यालयांकडून ठेकेदारांना निविदा नसतानाही ही कामे करण्यास गळ घालण्यात आली आहे. मात्र अद्यापही ही कामे ठप्पच असल्याचे चित्र आहे.

५० लाखांच्या निविदा मंजुरीच्या प्रतिक्षेत

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक तेरा, एकतीस आणि बत्तीसमधील ठेकेदाराची मुदत एक ऑगस्ट रोजी संपुष्टात आली आहे. नवीन निविदा प्रक्रिया झालेली नाही. एक कोटी सात लाख रुपयांच्या निविदेपैकी पन्नास लाखांच्या दोन निविदा अद्यापही मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. तर एक निविदा वाढीव दराने आल्यामुळे त्याची फेरनिविदा काढावी लागण्याची शक्यता आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास सप्टेंबर महिन्याचा कालावधी उजाडण्याची शक्यता असून कंत्राटी स्वच्छता सेवक तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

सायकल खरेदीचा निधी वळवला

प्रभागातील दैनंदिन झाडणकामे ठप्प असल्याच्या आणि गणेशोत्सवाच्या कालावधीत महापालिका प्रशासनाकडून मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत दहा कोटी रुपयांच्या निधी मंजुरीचा प्रस्ताव आयत्यावेळीस ठेवण्यात आला. सायकल खरेदीसाठीच्या निधीतून हे दहा कोटी रुपये शहर स्वच्छतेसाठी देण्याची वेळ प्रशासनावर आली. स्थायी समितीनेही या दहा कोटी रुपयांच्या वर्गीकरणाला मान्यता दिली असून ही रक्कम पंधरा क्षेत्रीय कार्यालयांना विभागून देण्यात येणार आहे. मात्र त्यानंतरही दैनंदिन साफसफाईची कामे तत्काळ सुरु होतील, याची शक्यता कमीच आहे.