उशीर झाल्याने मुख्यमंत्र्यांची बैठक रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रथमच ‘संवाद’ होणार म्हणून उत्साहात असलेल्या पिंपरी पालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचा ती बैठकच रद्द झाल्याने चांगलाच हिरमोड झाला आहे. आधीच्या कार्यक्रमांना उशीर झाल्याने ही बैठक रद्द करण्यात आली. पुन्हा अशी बैठक होईल की नाही, याविषयी पक्षवर्तुळातूनच साशंकता व्यक्त करण्यात येते.

पिंपरी पालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री शनिवारी शहरात आले होते. या निमित्ताने भोसरी नाटय़गृहातील वरच्या भागातील सभागृहात पक्षाच्या नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी नगरसेवक, पदाधिकारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते यांना मिळणार होती. त्यामुळे पालिकेच्या जाहीर कार्यक्रमांपेक्षा या बैठकीचे नगरसेवकांना अधिक आकर्षण होते. मुख्यमंत्र्यांनी साडेतीन ते पाच असा दीड तासाचा वेळ पिंपरी-चिंचवडसाठी दिला होता. मात्र, आधीच्या कार्यक्रमांना उशीर झाल्याने ते पावणे पाचच्या सुमारास भोसरीत आले. परिणामी, पालिकेचे तसेच भाजप नेत्यांचे नियोजन कोलमडले. अनेक गोष्टींना कात्री लावण्यात आली. भाषणांची संख्या कमी करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणजे, नगरसेवकांची बैठकही रद्द करण्यात आली. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी होती. पक्षाच्या काही नगरसेवकांना तसेच पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांसमोर ‘मन मोकळं’ करायचे होते. मात्र, बैठक रद्द झाल्याने त्यांच्यात संवाद होऊ शकला नाही.