देवेंद्र फडणवीस यांचे मत

‘‘महाविद्यालयांना हळूहळू स्वायत्तता मिळायला हवी, परंतु ती गुणवत्तेसाठी हवी. केवळ नियामक संस्थांपासून सुटका करून घेण्यासाठी स्वायत्तता असेल तर त्याने शिक्षणाचे नुकसानच होईल,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘गुणवत्ता कशी निर्माण करता येईल याचा निर्णय शिक्षक व प्राचार्यानी करायला हवा. आपली महाविद्यालये केवळ शिक्षणाची दुकाने असतील की त्यात खऱ्या अर्थाने शिक्षण मिळेल याचा विचार करणे आवश्यक आहे,’ असेही ते म्हणाले.

‘माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’तर्फे (मिटसॉग)आयोजित करण्यात आलेल्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे उद्घाटन शुक्रवारी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजूमदार व एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांना या वेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, अणुशास्त्रज्ञ व ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, पत्रकार राजीव खांडेकर, एमआयटी समूहाचे उपाध्यक्ष राहुल कराड, संस्थापक विश्वस्त प्रकाश जोशी, विश्वस्त व कार्यकारी संचालक डॉ. मंगेश कराड या वेळी उपस्थित होते.

‘जोपर्यंत गुणवत्तेकडे लक्ष दिले जाणार नाही, तोपर्यंत आपण एकविसाव्या शतकाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मनुष्यबळ तयार करू शकणार नाही,’ असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,‘‘शिक्षणाचा पाया हा विस्तारीकरण, अंतर्भाव व गुणवत्ता या तीन घटकांवर उभा आहे. शिक्षणसंस्थांचे नियमन करणाऱ्या संस्थांची संख्या कमी करायला हवी हे मला पटते, तसेच खासगीकरणाच्याही मी विरोधात नाही. शिक्षणाचे विस्तारीकरण झाले, पण आजही ज्याच्याकडे पैसा नाही तो शिकू शकत नाही. तरीही विविध प्रकारच्या स्कॉलरशिप्सच्या माध्यमातून काही प्रमाणात समावेशन झाले. असे असले तरी विद्यार्थी केवळ कागदावर शिक्षित असले तर शिक्षणपद्धतीवर ते मोठेच प्रश्नचिन्ह ठरेल.

त्यामुळे गुणवत्तेबद्दल विचार व्हायला हवा. आपल्या संस्कृतीत शिक्षकांनी कधी पैशांसाठी ज्ञान दिले नाही. त्यांनी पैशांचे दुकान उघडले नाही म्हणूनच त्यांना आदराचा दर्जा मिळाला. आपण देत असलेले ज्ञान प्रत्यारोपित होत आहे का, हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात घ्यायला हवे.’’

‘ज्ञान मूठभर लोकांच्या हाती राहिले तर समाज पुढे जाऊ शकत नाही. जेव्हा-जेव्हा ज्ञानाला काही लोकांपुरतेच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा गुलामीचा सामना करावा लागला,’ असेही त्यांनी सांगितले.