आगामी नाटय़संमेलनासाठी सात शाखांकडून निमंत्रणे आली आहेत. नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या ऑगस्टमध्ये होणाऱ्या बैठकीत संमेलनाचे स्थळ निश्चित होणार आहे, असे अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी शनिवारी सांगितले.
नाटय़संमेलनासाठी जळगाव, नागपूर, कोल्हापूर, सातारा, नाशिक, उस्मानाबाद आणि िपपरी-चिंचवड अशा सात शाखांकडून निमंत्रणे आली आहेत. परिषदेच्या नियामक मंडळाच्या ११ जुलै रोजी नाशिक येथे होणाऱ्या बैठकीमध्ये या निमंत्रणांसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. मात्र, संमेलन स्थळाबाबतचा अंतिम निर्णय हा ऑगस्टमध्ये होणाऱ्या बैठकीमध्येच घेतला जाईल, असेही करंजीकर यांनी सांगितले. परिषदेतर्फे नोव्हेंबरमध्ये सोलापूर येथे पहिले बालनाटय़संमेलन घेण्यात येणार असून आमदार प्रणिती शिंदे या संमेलनाच्या निमंत्रक आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नाटय़परिषदेच्या घटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल नुकताच नाटय़परिषदेला सादर केला आहे. ऑगस्टमध्ये त्यासाठी नियामक मंडळाची खास बैठक बोलावण्यात येणार असून त्यामध्ये या विषयावर चर्चा केली जाणार आहे. नियामक मंडळाच्या मान्यतेनंतर कार्यकारिणीमध्ये या दुरुस्तीला मान्यता घेतली जाईल. नाटय़परिषदेची आगामी निवडणूक ही नव्या घटनेनुसार व्हावी हा कटाक्ष असेल, असेही करंजीकर यांनी सांगितले. मतपत्रिका जमा करण्याची पद्धती बाद करून प्रत्यक्ष केंद्रावर येऊन मतदान करण्यासंदर्भातील सूचना त्याचप्रमाणे नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळावर शाखांच्या प्रतिनिधींना सामावून घेणे यांसारख्या सूचनांचा समावेश आहे. मात्र, हा अहवाल अद्याप मी पाहिलेला नसल्याने अधिक बोलता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
नाटय़संगीत कार्यशाळा
अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेतर्फे प्रथमच पुणे, मुंबई आणि नागपूर येथे नाटय़संगीताची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री आणि नाटय़संमेलनाध्यक्षा फैयाज या कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. जुलैअखेरीस किंवा ऑगस्टमध्ये पुण्यात कार्यशाळा होणार असून सुनील महाजन आणि भाऊसाहेब भोईर या कार्यशाळेचे निमंत्रक आहेत, असे दीपक कंरजीकर यांनी सांगितले.