चाकण भागात एका कंपनीच्या गोदामाला शुक्रवारी दुपारी आग लागली. आगीत गोदामात ठेवलेले साहित्य तसेच आवारातील चार ट्रक जळाले. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

पुणे-नाशिक मार्गावर चिंबळी फाटा भागात महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामाला दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली. गोदामात वाहनांसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले होते. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले.

गोदामाच्या आवारात असलेल्या चार ट्रकला आगीची झळ पोहोचली आणि ट्रक पूर्णपणे जळाले. या घटनेची माहिती मिळताच चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाचे दोन बंब, पिंपरी महापालिकेचे दोन बंब तसेच पाण्याचे सात टँकर घटनास्थळी दाखल झाले. गोदामातील साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. अग्निशमन दलाकडून उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रात्री आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी  झाली नाही.