गणेशोत्सवात नद्यांचे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने निर्माल्य गोळा करण्याचा व त्यापासून खतनिर्मिती करण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांकडून राबविण्यात येतो. या उपक्रमात आता वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागानेही सहभाग घेतला असून, प्रथमच राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे.शहरातील वाहणाऱ्या नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्यात, यासाठी विविध संस्थांच्या व पालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न करण्यात येत असतात. गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणावरील निर्माल्य नद्यांमध्ये टाकले जात असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने होणारा अपाय लक्षात घेता, गणेश विसर्जन घाटाच्या परिसरात निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात येत असतात. याबाबत जनजागृतीची मोहीमही हाती घेण्यात येते. गणरायासह निर्माल्याचे विसर्जनही नदीमध्ये व्हावे, अशी इच्छा असणाऱ्या भाविकांकडून आजही निर्माल्य नदीतच टाकले जात असले, तरी मागील काही वर्षांच्या जनजागृतीमधून बहुतांश गणेशभक्तांकडून निर्माल्य नदीत न टाकता ते कलशात टाकले जाते.प्रदूषणमुक्तीच्या या उपक्रमात आता वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागही सहभागी झाला आहे. दोन्ही विभागांच्या सहभागाने गोळा झालेल्या निर्माल्यापासून रोपांसाठी खताची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या विभागाकडून प्रथमच असा उपक्रम राबविण्यात येत आहे. विभागाने यासाठी शहरातील अनेक मंडळांशी संपर्क साधून, त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. वनविभागाच्या वतीनेही यंदा विसर्जन घाटाच्या परिसरात निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे गणेश मंडळांना निर्माल्य जमा करण्यासाठी बकेट देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जनजागृतीच्या दृष्टीने फलकही लावण्यात येणार आहेत. पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्माल्य द्या, खत घ्या..!गणेश भक्तांकडून निर्माल्य जमा करण्याच्या उपक्रमात महापालिकेसह विविध संस्था, संघटना प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. डी. एस. कुलकर्णी फाउंडेशन, स्वच्छ संस्था, कोथरूड रोटरी क्लब ऑफ पुणे व महापालिका यांनी यंदा संयुक्तपणे एक उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. ‘निर्माल्य द्या, खत घ्या’ असे या उपक्रमाचे नाव असून, निर्माल्याचे खत तयार करून ते संबंधितांना देण्यात येणार आहे.