वाहनबंदीच्या निषेधार्थ कामगार संघटनेचे बंड

कामगारांची सुरक्षितता व सोयीचे कारण देत टाटा मोटर्समध्ये वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयावरून कामगार व व्यवस्थापन यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. व्यवस्थापनाच्या वाहनबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ कामगारांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. या निर्णयाचा फेरविचार न केल्यास वाहने कंपनीच्या आत आणणारच, अशी भूमिका कामगार संघटनेने घेतली आहे.

कंपनीचे कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर यांनी १२ एप्रिलला एक परिपत्रक जारी केले. त्यानुसार, पुणे-िपपरी प्रकल्पातील सीव्हीबीयू, पीव्हीबीयू, ईआरसी, टीटीएल विभागासह चिंचवड येथील प्रकल्पांमधील कामगारांना १७ एप्रिलपासून कंपनीत चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे, दोन मे पासून दुचाकी वाहनांना ही बंदी लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सायकलचा वापर करण्याची मुभा मात्र कंपनीने दिली होती. या वाहनबंदीस कामगारांनी तीव्र विरोध केला आहे.

चार वर्षांपूर्वी ‘टाटा’ची वाहने घेण्याचा आग्रह कामगारांना करण्यात आला तेव्हा जवळपास १२०० कामगारांनी कंपनीची विविध वाहने खरेदी केली.

आता त्याच वाहनांना व्यवस्थापनाने प्रवेश बंदी केली आहे. जवळपास १८०० कामगार कंपनीच्या जवळपासच्या भागात राहतात. तर, ‘पीव्हीयू’चे १३०० कामगार स्वत:च्या वाहनांनी येत असल्याचे सांगत कामगारांच्या दृष्टीने कंपनीचा हा निर्णय त्रासाचा व मनस्तापाचा आहे, अशा भावना कामगार प्रतिनिधींनी व्यवस्थापनाला दिलेल्या पत्रात व्यक्त केल्या आहेत.

कामगारांची गैरसोय टाळावी, यासाठी कामगार नेत्यांनी सतीश बोरवणकर यांची भेट घेतली व ही बंदी रद्द करण्याची मागणी केली. तथापि, त्यांनी त्यास नकार दिला. व्यवस्थापनाची ही बंदी अयोग्य व अव्यवहार्य असून कामगारांना न पटणारी आहे, असे सांगत कामगार संघटनेने बंडाची भूमिका घेतली आहे. या निर्णयाचा फेरविचार न झाल्यास विरोध व्यक्त करण्यासाठी वाहने कंपनीच्या प्रवेशद्वारातून आत आणण्याचा इशारा कामगार प्रतिनिधींनी दिला आहे. यामुळे कंपनी व व्यवस्थापन यांच्यात पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कंपनीने यासंदर्भात कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.