मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याचे निमित्त झाले आणि पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना-भाजपमध्ये जुंपल्याचे चित्र पुढे आले आहे. मुख्यमंत्री पत्रांना उत्तर देत नाहीत, अशी तक्रार शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. तर, मुख्यमंत्र्यांवरील टीका हा बारणे यांचा प्रसिध्दीचा स्टंट आहे, अशी टीका भाजपचे माजी सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी प्रत्युत्तर देताना केली आहे.
पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राला आठ दिवसात उत्तर मिळते. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून तशी तसदी घेतली जात नाही. जनतेच्या प्रश्नांचे राज्य सरकारला गांभीर्य नाही. राज्यातील खासदारांची बैठक घेण्याचा पायंडा मुख्यमंत्र्यांनी बंद केला, ते चुकीचे आहे, असे बारणे यांनी म्हटले आहे. या संदर्भात, निसळ यांनी, बारणे खोटे बोलत असून त्यांचा बोलविता धनी राष्ट्रवादीत आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे. प्रश्न सोडवण्याऐवजी निवेदने देऊन केवळ छायाचित्र काढून घेण्यात बारणे यांना रस आहे. त्यांची निष्ठा अजित पवारांवर असून सध्या ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, असा आरोप केला आहे.