अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तरीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रातील १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अस्तित्वाबाबत अद्याप संदिग्धताच आहे. विद्यापीठाने त्रुटी असलेल्या या महाविद्यालयांना अद्याप मान्यता दिलेली नाही. नियमानुसार केंद्रीय प्रवेश फेरीत समाविष्ट होणाऱ्या महाविद्यालयांची माहिती ३१ मेपूर्वीच पाठवणे बंधनकारक असल्यामुळे या महाविद्यालयांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने राज्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांबाबत कडक धोरण अवलंबले. त्रुटी असलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली. त्रुटी असूनही विद्यापीठाने झुकते माप दिलेली महाविद्यालयेही या कारवाईच्या फेऱ्यांत सापडली. त्यामुळे विद्यापीठालाही त्यांच्याबाबत यावर्षी कडक पावले उचलावी लागली आहेत. विद्यापीठाकडून त्रुटी असलेल्या बारा महाविद्यालयांना ‘संलग्नता का काढून घेण्यात येऊ नये,’ अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यानंतर प्रक्रियेनुसार महाविद्यालयांनी त्यांचे म्हणणे मांडण्यास संधी देणे, त्यांची सुनावणी घेणे आवश्यक आहे. मुळातच या प्रक्रियेबाबत विद्यापीठ उशिरा जागे झाल्यामुळे पुढील प्रक्रियाही लांबली आहे. त्यामुळे यावर्षी या महाविद्यालयांची संलग्नता आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
न्यायालयाचे आदेश आणि नियमानुसार महाविद्यालयांना कोणत्याही अटींच्या आधारे संलग्नता देता येत नाही. मान्यता असलेल्या महाविद्यालयांचाच केंद्रीय प्रवेश फेरीत समावेश होतो. त्यासाठी तंत्रशिक्षण विभागाला ३१ मेपूर्वी मान्यताप्राप्त महाविद्यालयांची नावे कळवणे आवश्यक असते. मात्र विद्यापीठांकडून या बारा महाविद्यालयांबाबत अद्यापही अंतिम निर्णयच झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. यानंतर विद्यापीठाने महाविद्यालयांना मान्यता दिल्यास नियम मोडून तंत्रशिक्षण विभाग त्यांचा केंद्रीय प्रवेश फेरीत समावेश करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या क्षेत्रातील या महाविद्यालयांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाविद्यालयांवर कारवाई का
’ शिक्षकांची संख्या कमी
’ पायाभूत सुविधांची कमतरता
’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना नियमित वेतन नाही
’ ग्रंथालये, प्रयोगशाळांमध्ये असुविधा
’ एआयसीटीईच्या नियमानुसार जागेचा अभाव