आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीच्या तगडय़ा आव्हानाला सामोरे जात असलेल्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये नेहमीप्रमाणे एकमेकांना स्वबळाचे इशारे देणे सुरू झाले आहे. गुरुवारी खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यामध्ये उडी घेत ‘काँग्रेसचा सन्मान ठेवून जागावाटप झाले नाही, तर आघाडी होणार नाही. त्यासाठी सर्वच्या सर्व २८८ जागांवर लढण्याची तयारी ठेवा,’ असा आक्रमक सूर लावला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागांच्या वाटपाबाबत बुधवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीने १४४ जागांचा आग्रह कायम ठेवला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तेवढय़ा जागा न देण्याबाबत काँग्रेस ठाम आहे. पुण्यात गुरुवारी झालेल्या पक्षाच्या विभागीय मेळाव्यातही काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हीच भूमिका आक्रमकपणे मांडली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,‘जागावाटपासंबंधीचा निर्णय घेताना काँग्रेसचा आत्ससन्मान महत्त्वाचा आहे. काँग्रेसचा सन्मान राखला जाणार नसेल, तर आघाडी होणार नाही. त्यासाठी २८८ जागांवर लढण्याची तयारी सुरू करा.’
या मेळाव्यात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे यांनीही स्वबळाचा घोषा लावला. ‘गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या १० जागा वाढल्या आणि राष्ट्रवादीच्या १२ जागा कमी झाल्या. त्यामुळे आमची शक्ती वाढली आहे. ‘म्हणून आम्हाला जागा वाढवून द्या’ या राष्ट्रवादीच्या मागणीत काही तथ्य नाही. त्यामुळे त्यांची १४४ जागांची मागणी आम्ही सहन करणार नाही. त्याऐवजी २८८ जागांची तयारी आपल्याला करायची आहे,’ असे माणिकराव म्हणाले.
‘जनतेसाठीच्या योजनांचे निर्णय सरकारला आता झटपट घ्यावे लागतील. तरच विजय मिळेल. लोकसभेत झटका सगळ्यांनाच बसला आहे. आघाडी की स्वबळावर हे गेल्या वेळीच सांगितले होते. त्यामुळे आता काही निर्णय हायकमांडवर सोडून चालणार नाहीत. काही गोष्टींचे निर्णय आपल्यालाच घ्यावे लागतील,’ असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. जो काही निर्णय घ्यायचा तो १ ते ५ ऑगस्ट दरम्यानच घ्या, अशीही सूचना त्यांनी केली.

विधानसभेच्या १४४ जागा आम्हाला देण्याची मागणी काँग्रेसने धुडकावून लावली आहे. त्यामुळे आता यासंदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार येत्या काही दिवसांत निर्णय घेतील. आमच्या पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे आमची भूमिका ऐकून घेतली गेली पाहिजे, असे आम्ही काँग्रेसला सांगितले आहे.
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस</p>