पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील आज पिंपरीत
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात राष्ट्रवादीचा प्रभाव असला आणि काँग्रेसची पूर्ववैभव मिळवण्याची धडपड सुरू असली तरी, आगामी महापालिका निवडणुका मात्र स्वबळावरच लढवण्याची भूमिका शहर काँग्रेसने घेतली आहे. सोमवारी (२७ जून) होणाऱ्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात याबाबतचे धोरण ठरण्याची दाट शक्यता आहे.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात दिवसभर चालणाऱ्या काँग्रेसच्या शिबिराचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. तर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत हंडोरे, डॉ. रत्नाकर महाजन आदी उपस्थित राहणार आहेत.
यासंदर्भात, पत्रकारांशी बोलताना साठे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसची स्थिती सुधारते आहे. विद्यानगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. मोहननगरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिला नाही, त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला होता. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे.
त्यादृष्टीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विविध आंदोलन, मोर्चा तसेच अन्य मार्गाने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोणाशीही आघाडी करण्यापेक्षा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची आमची तयारी आहे. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. त्यांना आमचे म्हणणे सांगणार आहोत. पक्षात कोणत्याही स्वरूपाची गटबाजी नाही. िपपरीत सत्ता स्थापित करणे अथवा सत्तास्थापनेत निर्णायक भूमिका बजावणे, यादृष्टीने प्रयत्न राहणार आहेत.