निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये भाजपने जाहिरातींवर २२०० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. भाजपकडे इतका पैसा आला कुठून, असा सवाल काँग्रेस पक्षाचे पुणे अध्यक्ष रमेश बागवे यांनी उपस्थित केला. ‘केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांना पैसे काढण्यासाठी बँकांच्या रांगेत उभे राहावे लागले. मात्र भाजपकडे जाहिरातींवर खर्च करण्यासाठी पैसा आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे,’ अशी मागणी बागवे यांनी केली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शंभराहून अधिक जणांचा बळी घेतला. संपूर्ण देश नोटा बदलून घेण्यासाठी रांगेमध्ये उभा असताना भाजपच्या नेत्यांकडे पैसे आले कुठून ?, असा प्रश्न रमेश बागवे यांनी उपस्थित केला. ‘राज्यातील निवडणुकांसाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करण्यात येते आहे. या खर्चाबद्दल मुख्यमंत्र्यानी स्पष्टीकरण द्यावे’, अशी मागणी बागवे यांनी केली. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यावेळी माजी आमदार दीप्ती चवधरी, मोहन जोशी उपस्थित होते.