राष्ट्रवादीच्या प्रभावक्षेत्रातील पिंपरी-चिंचवड शहरातील तीनपैकी दोन विधानसभा मतदारसंघावर दावा करण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. चिंचवडसह पिंपरी मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घ्यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रितपणे आघाडी सरकारमध्ये असतानाही राष्ट्रवादीने कायम गद्दारीचे राजकारण केल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
काँग्रेसची शहरात काही ताकद नसल्याने त्यांच्याकडे असलेला चिंचवड मतदार राष्ट्रवादीने आपल्याकडे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मयूर कलाटे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती, त्यास काँग्रेसचे गटनेते नढे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेसचा हक्काचा मतदार आहे. चिंचवड सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंबहुणा, पिंपरी मतदारसंघही काँग्रेसने आपल्याकडे घ्यावा, असे नढे यांनी म्हटले आहे. एकीकडे राज्यात काँग्रेससमवेत सत्ता उपभोगत असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले कलाटे चुकीची विधाने करत आहेत. आमच्या पक्षाची ताकद ठरवणारे ते कोण. काँग्रेसने आतापर्यंत आघाडी धर्माचे पालन केले आणि राष्ट्रवादीला मदतच केली. मात्र, राष्ट्रवादीने काँग्रेसशी कायम गद्दारीच केली. चिंचवड मतदारसंघात शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी असताना राष्ट्रवादीने बंडखोर निवडून आणला होता. काँग्रेसने मदत केली नाही तर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील का, याचा विचार राष्ट्रवादीने करावा. काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याने पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने बोलावे, असे नढे यांनी म्हटले आहे.