देहूरोड चौकात कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी  शिर्डी शिरगावला निघालेल्या मित्रांवर काळाने घाला घातला. देहूरोड येथील सेंट्रल चौकात भरधाव वेगाने दुचाकीने कंटेनरला मागून धडक दिली. यामध्ये एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. निखिल शिवाजी शेडगे (वय १९) आणि यश हरी घोगडें(वय १७) अशी या तरुणांची नावे आहेत. यात निखिल शेडगे याचा या मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवार असल्याने निखिल आणि यश हे दोघे दुचाकीवरुन प्रति शिर्डी शिरगावला जात होते. दोघेही ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथील रहिवाशी आहेत. दुपारी दोनच्या सुमारास त्यांची दुचाकी कंटेनरला पाठीमागून जोरदार धडकली. यामध्ये निखिल शेडगे याचा जागीच मृत्यू झाला. यश घोंगडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ते पुढील तपास करत आहेत.