कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संचालक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह रत्नाकर अनंतराव कुलकर्णी (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन विवाहित कन्या असा परिवार आहे.
स्व. अनंतराव कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनची धुरा रत्नाकर यांनी आपले बंधू दिवंगत अनिरुद्ध यांच्यासमवेत ४५ वर्षे सांभाळली. प्रकाशन व्यवसायाबरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. परिषदेच्या माध्यमातून विविध पदांवर काम करताना त्यांनी अनेक संस्थांना परिषदेशी जोडले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर प्रतिनिधित्व केलेले रत्नाकर हे मराठी प्रकाशक परिषदेचे सदस्य होते. पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने, त्याचप्रमाणे साहित्यप्रेमी म्हणूनही त्यांचा साहित्य संमेलनात सहभाग असे. गेल्या दोन महिन्यांपासून फुफ्फुसाच्या कर्करोगाने ते आजारी होते. खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. रत्नाकर कुलकर्णी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.