एका सरळ रेषेत जाणारी हेलिकॉप्टर.. दोन-दोनच्या गटाने अवकाशात झेपावणारी.. आयताकृती आणि चौकोनी संरचना.. आकाशामध्ये संपूर्णपणे उलटे होऊनही त्याच गतीने चालवली गेलेली चार हेलिकॉप्टर.. हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत ‘सारंग’ चमूने उपस्थितांची मनेजिंकली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३०व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनानंतर सारंग चमूने साकारलेली ही चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहताना साऱ्यांचे देहभान हरपले आणि टाळय़ांचा गजर करून सारंग चमूला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला.
हिंदूुस्थान अ‍ॅरोनॉटिक्स येथे तयार झालेले संपूर्ण भारतीय बनावटीचे ‘ध्रुव’ हे ‘अ‍ॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर’ २००२ मध्ये लष्कराच्या तीनही दलांमध्ये दाखल झाले. सर्व प्रकारच्या वातावरणात उड्डाण करण्याची क्षमता आणि कोणत्याही स्वरूपाचे उद्दिष्ट साध्य करण्याची क्षमता हे या हेलिकॉप्टरचे वैशिष्टय़ आहे. अवजड यंत्रणा वाहण्यासाठी त्याचप्रमाणे रुग्णवाहिका म्हणूनही या हेलिकॉप्टरचा वापर होऊ शकतो. दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये ध्रुव हेलिकॉप्टर उत्तम काम करते. देशामधील नैसर्गिक संकटाच्या काळामध्ये आपत्ती निवारणाच्या कामामध्ये ध्रुवने मोलाची कामगिरी बजावली आहे. ध्रुव हेलिकॉप्टरची चाचणी करण्यासाठी संघबांधणी करण्यात आली होती. त्या संघाचे सारंग म्हणजेच मयूर असे नामकरण करण्यात आले आहे. सारंग चमूमध्ये काम करण्यासाठी हवाई दलातील अनेक जण उत्सुक असले तरी कठीण चाचण्या आणि परीक्षा उत्तीर्ण होतात तेच पायलट या संघामध्ये येण्यासाठी पात्र ठरतात.

पदकविजेते तिघेही स्नातक भूदल शाखेचे
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३०व्या तुकडीतील तिघेही पदकविजेते स्नातक भूदल (आर्मी) शाखेचे आहेत. आता हे तिघेही डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी येथे पुढील प्रशिक्षण घेणार आहेत. तिघांचेही पालक आपल्या पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
प्रबोधिनीतील प्रशिक्षण खडतर असले तरी ही तीन वर्षे छान गेली. आमच्या लष्करी सेवेची ही सुरुवात आहे. देशाच्या सीमांचे संरक्षण करताना प्राण गमवावे लागले तरी त्यामध्ये आनंद असल्याची भावना राष्ट्रपतींचे सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या आसाम येथील अविनाश छेत्री याने व्यक्त केली. दीक्षान्त संचलनाचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी बहुमान असल्याचेही त्याने सांगितले.
रौप्यपदकविजेत्या उत्कर्ष पाण्डेय याने माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर खुशी पाहताना मनापासून आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. मूळचा लखनौ येथील उत्कर्षने हे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले असले तरी भविष्यात आणखी खडतर काम करावयाचे असल्याचे सांगितले. तीन वर्षे केलेल्या कठोर मेहनतीचे फळ मिळाले असून, पालकांचे नाव मोठे करू शकलो याचा आनंद असल्याची भावना कांस्यपदकविजेत्या नमन भट्ट याने व्यक्त केली. तो मूळचा उत्तराखंडचा आहे.

‘एनडीए’चे कमांडंट नौदलाचे उपप्रमुख
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) कमांडंट व्हाइस अ‍ॅडमिरल जी. अशोककुमार हे आता नौदलाचे उपप्रमुख झाले आहेत. त्यामुळे प्रबोधिनीच्या १३०व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनाबरोबरच त्यांनाही निरोप देण्यात आला. प्रबोधिनीच्या चित्ररूप पुस्तिकेचे (कॉफी टेबल बुक) प्रकाशन लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रबोधिनीतून स्नातक म्हणून बाहेर पडल्यानंतर त्याच संस्थेचा प्रमुख म्हणून काम करणे माझ्यासाठी आनंददायी आणि अभिमानाची गोष्ट होती. काळानुरूप प्रशिक्षणामध्ये बदल करीत स्नातकांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले असल्याची भावना व्हाइस अ‍ॅडमिरल जी. अशोककुमार यांनी व्यक्त केली.