मार्गदर्शक तत्त्व निश्चित करण्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे आश्वासन

व्यापारी बँकांकडून दुजाभाव होत असल्याने नागरी सहकारी बँकांना सध्या पुरेशी रोकड उपलब्ध करून दिली जात नसल्याने निर्माण झालेला प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.

व्यापारी बँकांकडून सर्व बँकांना समान रोकड पुरवठा होण्याच्या दृष्टीने लवकरच मार्गदर्शक तत्त्व निश्चित करण्यात येणार असल्याचे आश्वासन रिझव्‍‌र्ह बँकेकडून देण्यात आले आहे. त्यावर नागरी बँकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी याबाबतची माहिती दिली. नागरी बँकांबाबत सध्या निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत असोसिएशनचे पदाधिकारी व रिझव्‍‌र्ह बँकेदरम्यान बुधवारी मुंबईत बैठक झाली. त्याची माहिती देताना अनास्कर म्हणाले, की नागरी बँकांना रोकड पुरवठा करताना व्यापारी बँकांकडून मिळणाऱ्या दुजाभावाच्या वागणुकीबाबत आम्ही रिझव्‍‌र्ह बँकेला उदाहारणांसह माहिती दिली.

रोकड देताना समानता आवश्यक आहे. सध्या रोकड मुळातच कमी असली, तरी तिचे वाटप करताना समानतेनेच होणे गरजेचे आहे, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्याबाबत व रोकड समान पद्धतीने वितरित होण्याबाबत नागरी सहकारी बँकांनी उपस्थित केलेले मुद्दे

रिझव्‍‌र्ह बँकेने मान्य केले. रकमेचे समान वाटप करण्याबाबत व्यापारी बँकांना सूचना देण्याचे तसेच समानतेच्या निकषाबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्व निश्चित करण्याचे आश्वासन रिझव्‍‌र्ह बँकेकडून देण्यात आले.