सहकारी बँकांच्या संचालकपदी अपात्र ठरविण्याच्या प्रक्रियेबाबत सुरू असलेली सुनावणी वेगवेगळी कारणे देऊन पुढे ढकलण्यात येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दिलीप सोपल, दिलीप माने यांनी या सुनावणीलाच आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता १३ जूनला ठेवण्यात आली आहे.

सहकारी बँकांमधील आर्थिक अनियमिततेच्या कारणास्तव रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशांनुसार बरखास्त करण्यात आलेल्या संचालक मंडळातील व्यक्तींना पुढील दहा वर्षे निवडणुकांसाठी बंदी घालणे व सध्या इतर सहकारी बँकेत संचालक असल्यास ते अपात्र ठरविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्याबाबतचा वटहुकूमही काढण्यात आला आहे. त्यानुसार सध्या अजित पवार, मोहिते-पाटील, सोपल व माने यांच्यासह सध्या विविध सहकारी बँकेवर संचालक मंडळात असलेल्या संचालकांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अजित पवार व मोहिते-पाटील राज्य सहकारी बँकेवर संचालक असताना संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. सोपल व माने हे सोलापूर येथील बँकेवर संचालक असताना तेथील संचालक मंडळ बरखास्त झाले होते.

राज्य शासनाच्या वटहुकमानुसार बँकेच्या संचालकांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत सध्या विभागीय सह निबंधक संतोष पाटील यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. पवार यांच्या वकिलांमार्फत सुनावणीची तारीख अनेकदा पुढे ढकलण्यात आली. शासनाच्या वटहुकमाबाबत माहिती अधिकारात माहिती घेण्याच्या कारणास्तवही दोनदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली. वटहुकूम काढण्याच्या प्रक्रियेमध्ये संतोष पाटील यांचाही सहभाग होता. त्यामुळे त्यांच्यापुढेच ही सुनावणी घेण्यास आता पवार यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. त्यानुसार ही सुनावणी १३ जूनला ठेवण्यात आली आहे.