महापालिका शाळांमधील शिक्षक शाळेत शिकवत असताना सर्रास मोबाइलचा वापर करत असल्याबद्दल तक्रार करण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून या प्रकाराची दखल घेण्यात आली असून शिक्षकांना शाळेत मोबाइल वापरावर बंदी करण्यात आली आहे. मोबाइल वापराबरोबरच व्हॉट्स अप, फेसबुक या समाजमाध्यमांचाही वापर शिक्षकांकडून होत होता.
महापालिका शिक्षण मंडळाने या बाबत आता आदेश काढला असून शाळेत असताना शिक्षकांनी त्यांचे मोबाइल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याची सक्ती या आदेशानुसार करण्यात आली आहे. शिक्षकांचे काही अत्यंत महत्त्वाचे काम असेल, तर तासिकांचा वेळ वगळून उर्वरित वेळेत शिक्षकांनी शाळेच्या फोनचा वापर कामासाठी करावा, असेही शिक्षकांना कळवण्यात आले आहे. मुख्याध्यापकांकडे जमा केलेले मोबाइल शाळेची वेळ संपल्यानंतर परत घ्यावेत, असेही या आदेशात नमूद करण्यात आले असून मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांनाही शाळेत मोबाइल आणण्यास बंदी करावी, असे कळवण्यात आले आहे. शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी तसेच रखवालदार यांच्याकडून होणारा मोबाइलचा सर्रास वापर लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी त्यावरही बंधन आणावे असेही कळवण्यात आले आहे.
महापालिका शाळांमधील शिक्षकांच्या मोबाइल वापराबद्दल उपमहापौर आबा बागुल यांनी गेल्या आठवडय़ात प्रशासनाकडे तक्रार केली होती. शिक्षकांकडून सर्रास मोबाइलचा वापर होत असून विद्यार्थ्यांना शिकवत असताना एखादा फोन आल्यास अध्यापनाचे काम थांबवून शिक्षक मोबाइलवर बोलण्याचे प्रकार घडत असल्याकडे बागुल यांनी लक्ष वेधले होते. तसेच शाळेच्या वेळेत शिक्षकांनी त्यांचे मोबाइल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याबाबत आदेश काढावा अशीही विनंती बागुल यांनी प्रशासनाला केली होती. त्यानुसार आता आदेश काढण्यात आला असून तो सर्व शिक्षकांना बंधनकारक असेल. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शालाप्रमुख/मुख्याध्यापकांवर देण्यात आली आहे. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत यांनी हे आदेश काढले आहेत.