राज्यात शिक्षण विभागाकडून पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या कलचाचणीच्या निष्कर्षांवरून विद्यार्थ्यांना समुपदेशनही करण्यात येणार असून त्याबाबतचे संकेतस्थळ मंगळवारी (३ मे) सुरू होणार आहे.

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची पहिल्यांदाच शिक्षण विभागाकडून यावर्षी कलचाचणी घेण्यात आली. या कलचाचणीचे निष्कर्ष लेखी स्वरूपात दहावीच्या निकालाबरोबर विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी हे निष्कर्ष ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा कल आणि संबंधित क्षेत्राची माहिती विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. कलचाचणीच्या निष्कर्षांवरून विद्यार्थ्यांना समुपदेशनही करण्यात येणार असून त्यासाठी मंगळवारपासून संकेतस्थळ सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे गुण व आवड संकेतस्थळावर नमूद केल्यास त्यांना विविध शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती इत्यादी माहिती या संकेतस्थळावरून मिळणार आहे. राज्यभरात ३० समुपदेशक रोज आठ तास समुपदेशन करणार आहेत. www.mahacareermitra.in या संकेतस्थळावर याबाबतचे तपशील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ८२७५१००००१ या क्रमांकावर करिअर मार्गदर्शन तसेच त्यांच्या शंका विचारता येणार आहेत.