बनावट ड्रायव्हिंग स्कूलच्या संख्येत वाढ; दोन वर्षांपासून तपासणीच नाही

राज्य शासनाचा आदेश असला तरी पिंपरी उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाने गेल्या दोन वर्षांपासून वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची (ड्रायव्हिंग स्कूल) तपासणीच केली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरवर्षी अशा ड्रायव्हिंग स्कूल्सची तपासणी करणे आवश्यक असताना ती केली जात नसल्यामुळे बनावट ड्रायव्हिंग स्कूलची संख्या वाढत असल्याने वाहन चालवण्याचे जेमतेम प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या चालकांची संख्याही वाढत आहे.

पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीतील अनेक व्यावसायिकांनी ड्रायव्हिंग स्कूल काढून चालक परवाने काढून देण्याचा धंदा सुरू केला आहे. अशा बोगस ड्रायव्हिंग स्कूलना आळा घालण्यासाठी शासनाने २००९ मध्ये अध्यादेश काढून सर्व ड्रायव्हिंग स्कूलची प्रत्येक वर्षांला तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर काही वर्षे आरटीओ कार्यालयाने ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी केली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारची तपासणीच करण्यात आलेली नाही.

पिंपरी आरटीओ कार्यालयाच्या हद्दीमध्ये हिंजवडी तसेच इतर परिसरात बोगस ड्रायव्हिंग स्कूल वाढत आहेत.

ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी करताना चालक प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे वाहन कोणत्या मॉडेलचे आहे, त्या वाहनाची तांत्रिक तपासणी केली आहे का, स्कूल ज्या जागेत चालविले जाते त्या ठिकाणी प्रसाधनगृह तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का, वर्गशाळा आहे का, संस्थेकडे असलेल्या प्रशिक्षकाला पाच वर्षांचा अनुभव आहे का, शाळेची प्रशिक्षण देण्याची पद्धती कशी आहे या सर्व बाबींची तपासणी झाल्यानंतर संस्थेला शंभर गुण मिळणे आवश्यक आहे. जर तपासणीमध्ये पन्नासपेक्षा कमी गुण मिळाले असतील तर ड्रायव्हिंग स्कूलचा परवाना रद्द करण्याचा अधिकार आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

आरटीओ कार्यालयाने तपासणी केलेल्या ड्रायव्हिंग स्कूलचा अहवाल वरिष्ठांना देण्याचे आदेशही अध्यादेशाद्वारे देण्यात आले आहेत. मात्र ड्रायव्हिंग स्कूल तपासणी होत नसल्याने आरटीओ कार्यालयाकडून या अध्यादेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

आरटीओ कार्यालयाच्या अशा बोटचेपी धोरणामुळे ड्राययव्हिंग स्कूल चालक फक्त वाहन परवाने काढून देण्याचे काम करत आहेत. अनेक ड्रायव्हिंग स्कूल चालकांच्या परवान्याची मुदत संपली असतानाही ते ड्रायव्हिंग स्कूल चालवत असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते विजय तापकीर यांनी बोगस ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिवहन आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात पिंपरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता बैठकीमध्ये व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.